नाशिक | Nashik
काल (रविवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगरपरिषदेच्या (Bhagur Municipal Council) पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले. यावेळी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी भाषणावेळी “मला अनेक प्रकारचा त्रास झाला आहे, माझ्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही मित्रपक्षाचा धर्म पाळतो, पण मित्रपक्षाच्या नेत्यांनाही शिस्त पाळायला सांगा, भगूरमध्ये तुम्ही काम करू नका असे मला सांगितले जाते, असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप केले.
यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या भाषणात आमदार सरोज अहिरेंची (MLA Saroj Ahire) पाठराखण देखील केली होती. मात्र यामुळे नाशिकमध्ये महायुतीत (Mahayuti) विकासकामांवरून श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचे दिसून आले. त्यानंतर आता आमदार सरोज आहिरे यांनी केलेल्या आरोपांवर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी ते म्हणाले की,”भगूर नगर परिषदेची पाणीपुरवठा योजना आमच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली होती. मात्र, याचे श्रेय लाटण्याचे काम आमदार सरोज अहिरे करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये झालेल्या आभार दौऱ्याच्या सभेत बोलतांना ‘भगूरला आपण पाणीपुरवठा योजना दिल्याचे सांगितले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यावरून भगूर नगर परिषदेची योजना आम्हीच मंजूर केली आहे असे स्पष्ट होते, असे विजय करंजकर यांनी म्हटले.
दरम्यान, आमदार सरोज अहिरे यांनी केलेल्या आरोपांनंतर शिवसेनेने देखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे आता राज्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील महायुतीत वेगवेगळ्या कारणांवरून नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर (Local Body Election) होण्याची शक्यता आहे.