Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा

Nashik Political : महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांचा नरहरी झिरवाळांना पाठिंबा

दिंडोरी | Dindori

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सहा महिने अगोदर मतदारसंघात फिरायला लावून उमेदवारीचे आश्वासन दिले. परंतू वेळेवर पक्ष निष्ठेचा विचार न करता उमेदवार (Candidate) आयात करुन निष्ठावतांना डावलले. उमेदवारी देतांना आम्हाला विचारले सुध्दा नाही व साधी चौकशी केली नाही. त्यामुळे आम्ही आपला पाठिंबा दिंडोरी पेठ विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार ना. नरहरी झिरवाळ यांना जाहीर करत असून महाविकास आघाडीचे प्रचंड मते ना. नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना मिळवून देवू व झिरवाळांचा विजय ऐतिहासिक करु, असे सांगून दिंडोरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार प्रा. अशोक बागूल यांनी ना, नरहरी झिरवाळ यांना पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला. अपक्ष उमेदवार सोमनाथ वतार यांनीही ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी २०० उमेदवार रिंगणात; १३७ जणांनी घेतली माघार

दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Dindori Peth Assembly Constituency) निवडणूकीत अर्ज माघारीच्या दिवशी प्रा. अशोक बागूल यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून राजकारणात आहोत. राजकीय, सामाजिक जीवनात काम करीत असतांना आम्ही शरद पवार यांच्या पक्षात झोकून दिले होते. पक्षाच्या वतीने आम्हाला फिरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आम्ही सहा महिने प्रचार करीत फिरत होतो. आम्हाला असे वाटले की, शरद पवार (Sharad Pawar) हे खरोखर निष्ठावतांना न्याय देतील परंतू पक्षाने आम्हाला डावलले. आम्ही निष्ठा ठेवली. आम्ही तुतारी चिन्ह सगळीकडे पोहचविले. तिकीट जाहीर केल्यानंतरही आम्हाला कुणी विचारले नाही. माझ्याबरोबर फिरणाऱ्या इतर उमेदवारांचाही पक्षाच्या श्रेष्ठींनी विचार केला नाही. म्हणून दिंडोरी पेठच्या सर्वांगीण विकास करणाऱ्या ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा देत आहोत.

हे देखील वाचा : Nashik Political : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या एका जागेसाठी १७ उमेदवार रिंगणात; मुख्य लढत ‘या’ चौघांमध्ये होण्याची शक्यता

पेसाबाबत विरोधकांनी फेकनैरेटिव पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतू ना. झिरवाळ यांनी मंत्रालयात जाळीवर मारलेल्या उडीमुळे १७ संवर्गातील कर्मचाऱ्यांना भरतीचा मार्ग मोकळा झाला. तो केवळ आदिवासी समाजाचा नव्हे तर जनरल समाजाचा सुध्दा फायदा झाला आहे. विरोधकांना पेसा म्हणजे काय? हे सुध्दा माहिती नाही. तालुक्यात सर्वत्र केवळ ना. झिरवाळ यांचेच कौतुक होत होते, हे आम्हाला प्रचार करतांना दिसून आले. तरी सुध्दा पक्षाकडे उमेद्वारीची मागणी केली परंतू पक्षाने आम्हाला डावलले. जिल्ह्यातील इतर पाच मतदार संघात सुध्दा निष्ठावतांना डावलून आयातांना संधी दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला आमची ताकद दाखवून देवू. सर्वच ठिकाणी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. सर्व सामान्य जनतेच्या उपयोगी पडणारे ना. नरहरी झिरवाळ हेच तालुक्याचा विकास करु शकतात आणि त्यांचे साधेपण सर्व जनतेला भावते. त्यामुळे आम्ही त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणू, असे प्रा. अशोक बागूल म्हणाले.

हे देखील वाचा : Nashik Political : येवल्यात १७ उमेदवारांची माघार; १३ जण निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, यावेळी अपक्ष उमेदवार सोमनाथ बतार यांनीही ना. नरहरी झिरवाळ यांना पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की, दिंडोरी पेठ तालुक्यात आज सर्वांत जास्त निधी आलेला दिसत आहे. महाराष्ट्रात ना. झिरवाळ यांनी कामे केली. ना. झिरवाळ यांच्या कामाची गती प्रचंड आहे. त्यामुळे त्यांना आपली माघार घेऊन त्यांना पाठिंबा देत आहोत, असे सोमनाथ वतार यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब जाधव, गणपतराव पाटील, प्रकाश वडजे, कैलास मवाळ, जे. डी. केदार, विनोद देशमुख, घनशाम चौधरी, राजेंद्र उफाडे, परिक्षित देशमुख, कृष्णा मातेरे, निळवंडीचे माजी सरपंच रामदास गवारी आदी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या