Wednesday, June 17, 2026
HomeनाशिकSanjay Raut : "शिंदे गट पहिला क्रमांकाचा शत्रू, आमच्याकडील मते…"; राऊतांचे नाशिकमध्ये...

Sanjay Raut : “शिंदे गट पहिला क्रमांकाचा शत्रू, आमच्याकडील मते…”; राऊतांचे नाशिकमध्ये विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मोठे वक्तव्य

नाशिक | Nashik

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Nashik Vidhan Parisahd Election) उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने ‘घोडेबाजार’ आणि घाणेरडे राजकारण मान्य नसल्याचे म्हणत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलेल्या ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

- Advertisement -

यावरून मविआतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. तसेच माजी आमदार अनिल कदम आणि वसंत गिते यांनी अर्ज घेऊन देखील ते दाखल न केल्याने पक्षात असंतोष असल्याचे बोलले जात होते. त्यावर आज (बुधवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ते म्हणाले की,”महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) आपले उमेदवार उभे केले आहेत. खरी रणधुमाळी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये असते,विधानपरिषद निवडणूक ही गोपनीय पद्धतीने होते. नाशिक मतदारसंघात उमेदवारी अर्ज देण्याचा निर्णय प्रारंभी झाला होता. निवडणुका बिनविरोध करायच्या नाही हे आमच्या पक्षाचे मुख्य धोरण होते. त्यादृष्टीने आम्ही मातोश्रीवर तसेच मुंबईला आणि स्थानिक नेत्यांची चर्चा करूनच नाशिकबाबत अंतिम निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता नाशिकमध्ये काय होतंय, ते आपण पाहूयात”, असे राऊत यांनी म्हटले.

शिंदे गट आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू

विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात सध्या घोडेबाजार सुरू झाला आहे. नाशिकमध्ये उमेदवार दिला नाही म्हणजे आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत असल्यामुळे कोणी इच्छुक पुढे आले नाहीत. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच घेण्यात आला आहे. आमच्याकडील मते कुणाला द्यायचे, याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील. तुम्हाला निकालाच्या वेळी कळेलच की आम्ही कुणाला मतदान केले. पण, आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू शिंदे गटच आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

आधी ‘मातोश्री’वर येऊन पश्चाताप व्यक्त करा

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपचे समोर असलेले आव्हान लक्षात घेता दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर या विधानावर बोलतांना राऊत म्हणाले की, “दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी आधी मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा. आधी त्यांना येऊ द्या, आल्यावर बघू,” अशा कडक शब्दांत त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मोदी आणि फडणवीस यांच्यावर हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा केवळ फसवणूक असतात. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे. प्रत्येक योजनेत सरकार लोकांची फसवणूक करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये. शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि मोदींच्या सभांना जाणे बंद केले, तर त्यांचे अनेक प्रश्न आपोआप सुटतील,” असे राऊतांनी म्हटले.

ताज्या बातम्या

Nashik News : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा मृत्यू

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पंचवटी परिसरातील स्वामीनारायण पोलीस चौकीसमोरील महामार्गावर भरधाव लक्झरी बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी...