नाशिक | प्रतिनिधी
नाशिकच्या राजकीय (Nashik Politics) वातावरणात पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. शिंदे सेनेला ‘जय महाराष्ट्र करत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील (Dr. Hemlata Patil) या आपल्या समर्थकांसह मंगळवारी (दि. १९) मुंबईत (Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.
याचबरोबर, पंचवटीतील तीन माजी नगरसेवक गुरुमित बग्गा, नरेश पाटील आणि नंदिनी चोडके हेही लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजकीय निरीक्षकांच्या मते, विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या (Mahayuti) सत्तास्थापनेनंतर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले होते. आता आगामी स्थानिक संस्थानच्या निवडणुकीच्या पाश्र्श्वभूमीवर पुन्हा पक्षप्रवेशाचे नवे सत्र सुरू होत असल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.
डॉ. हेमलता पाटील यांच्याबरोबर युवकी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कल्पेश जेजुरकर, दर्शन पाटील, शरदचंद्र पवार गटाचे डॉ. झाकीर शेख यांच्यासह प्रभागातील ४०० कार्यकर्ते, पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. डॉ. हेमलता पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून (Nashik Central Vidhansabha) निवडणूक (Election) लढवत तत्कालीन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना कडवी टक्कर देत ४६ हजार मते मिळवली होती.
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागावाटपामुळे नाराज झालेल्या डॉ. पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि काही काळ शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मात्र, स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे त्यांनी शिंदेसेनेलाही सोडचिठ्ठी दिली. आता त्या राष्ट्रबादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवक्त्या म्हणून काम पाहण्याची शक्यता आहे. हेमलता पाटील यांची राजकीय कारकीर्द अनेकदा चर्चेत राहिलेली आहे, त्यामुळे आता त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटमध्ये जाण्याचा निर्णय कितपत योग्य ठरतो हे येणारा काळच ठरवेल.
भाजपकडून प्रवेशाचा दुजोरा
दरम्यान, पंचवटीतील माजी उपमहापौर गुरमितबग्गा, नरेश पाटील आणि मनसेच्या माजी नगरसेविका नंदिनी बोडके यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला असून त्याबाबतची अंतिम बोलणी सुरू आहे. हे तिन्ही माजी नगरसेवक आमदार राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांच्यासोबत सक्रियपणे काम करत असून, त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. प्रवेशाच्या वृत्ताला भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांनीही दुजोरा दिला असून चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा काँग्रेसचा समविचारी पक्ष असल्यामुळे या पक्षात आणि या पक्षाचे नेते अजित पवार यांच्याबरोबर काम करणे कम्फर्टेबल वाटेल. या पक्षाने आपला फुले, शाहू, आंबेडकर हा पुरोगामी विचार अबाधीत ठेवलेला आहे. त्यामुळे काम करणे सोयीचे वाटेल. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या कामाची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणत्याही लोकहिताच्या कामासाठी ते तत्काळ निर्णय घेत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेविका




