पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. रुग्णालयातून शरद पवार थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रतिभा पवार देखील आहेत. डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला असून पवार यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र विठ्ठल मणियार यांनी दिली.
डॉक्टरांनी शरद पवारांना सांगितलं आहे की, दौरे कमी केले पाहिजेत. प्रवास कमी केला पाहिजे, त्याच्यात थोड्या मर्यादा आणल्या पाहिजेत. प्रवासही कमी केले पाहिजे, दुसरं त्यांनी डाएट व्यवस्थित घेतला पाहिजे, ते खाण्याच्या बाबतीत फार दक्षता घेत नाहीत, त्यांना सांगावं लागतं हे खा, ते खा, ऑपरेशन झाल्यानंतर साहेबांना लिक्वीड डाएट घ्यावं लागतं, लिक्वीड डाएट घेऊन माणूस कंटाळतो, सारखं तेच तेच. आता थोडा थोडा बदल होतो आहे, दुधासोबत भाकरी वगैरे खात आहेत, त्यामुळे आता हळूहळू त्यांचा अशक्तपणा कमी होईल, त्यांनी दोन चार दिवस आराम केला पाहिजे, असंही विठ्ठल मणियार यांनी म्हटलं आहे.
देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत आम्ही सोबत काम करु
त्याचबरोबर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अनेक फोन आले, आज महत्त्वाचा फोन आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. त्यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्याचबरोबर अत्यंत प्रेमाने मोदींनी सांगितलं, “शरदराव, तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम करू. तुम्ही विश्रांती घ्या आणि आम्हाला मार्गदर्शन करत राहा, मार्ग दाखवत राहा. तुम्ही काळजी घेणे आणि या गोष्टींपासून थोडे दूर राहणे गरजेचे आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहावे हीच आमची इच्छा आहे, तुमचा सल्ला आम्हाला मिळत राहो आणि तुम्ही तंदुरुस्त राहा”, अशा प्रकारे त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि सदिच्छा देखील दिल्या.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांना कफ आणि तीव्र खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांचा नियोजित दुष्काळ दौरा तातडीने रद्द करून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवारांवर कोणतीही मोठी वैद्यकीय ट्रीटमेंट करण्याची गरज पडलेली नाही. केवळ नियमित तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते.
शरद पवार रुग्णालयातून बाहेर
शरद पवार यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते रुग्णालयाच्या बाहेर आले. व्हिलचेअरवरूनच त्यांना बाहेर आणलं. बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पाहून हात उंचावले. त्यांचा हा फोटो समोर आला आहे. त्यानंतर कारमध्ये बसले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. रुग्णालयातून निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व स्टाफचे हात जोडून आभार मानले.




