नाशिक | विजय गिते | Nashik
आगामी काळात जिल्ह्याच्या (District) राजकीय नकाशात मोठे फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राज्यसभेचा (Rajyasabha) राजीनामा दिला आहे. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव आघाडीवर आहे.
छगन भुजबळ यांची राज्यसभा उमेदवारी निश्चित झाली तर जिल्ह्याला त्यांच्या रूपाने चौथा खासदार मिळणार आहे. भुजबळ यांची एण्ट्री नाशिकच्या राजकारणातील एका मोठ्या ‘पॉवर शिफ्ट’ची नांदी ठरू शकते. पण येवल्याच्या (Yeola) मैदानात समीर भुजबळांना नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. छगन भुजबळ हे ओबीसींचे राष्ट्रीय स्तरावरील चेहरा आहेत. गेल्या काही काळापासून त्यांना दिल्लीत सक्रिय करण्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत गृहमंत्री अमित शाह यांनी भुजबळांना राज्यसभेसाठी अनुकूलता दर्शवली होती. उत्तर भारतात ओबीसी म तांचे गणित जुळवण्यासाठी त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची राज्यसभेवर वर्णी लागणे महायुतीसाठी फायदेशीर ठरू शकते.
छगन भुजबळ दिल्लीत (Delhi) गेल्यास येवला मतदारसंघाचे काय? हा प्रश्न सध्या नाशिकच्या (Nashik) राजकारणात सर्वात महत्त्वाचा ठरला आहे. गेल्या दोन वर्षांपासून माजी खासदार समीर भुजबळ यांनी येवल्यात आपले कार्यक्षेत्र विस्तारले आहे. छगन भुजबळ आजारपणामुळे सक्रिय नसताना समीर भुजबळ यांनी येवला नगरपालिकेच्या निवडणुकीत एकहाती सूत्रे सांभाळून राष्ट्रवादीला यश मिळवून दिले. सध्या समीर भुजबळ हे मतदारसंघात सातत्याने बैठका, जनसंपर्क आणि विकासकामांचा आढावा घेत आहेत, जे त्यांचे आगामी विधानसभेचे दावेदार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. भुजबळांच्या या हालचालींमुळे नाशिकमधील स्थानिक समीकरणेही बदलणार आहेत.
तूर्त कोणताही विचार नाही : भुजबळ
छगन भुजबळ यांचा राज्यसभेवर जाण्याचा तूर्त कोणताही विचार नाही. सध्याच्या राज्यसभेच्या जागेचा केवळ दोन ते अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. अशावेळी राज्यातील मंत्रीपद आणि आपली ज्येष्ठता सोडून दिल्लीला जाणे तितकेसे संयुक्तिक वाटत नाही, असे माजी खासदार समीर भुजबळ सांगत असले तरी त्यांची येवल्यातील सक्रियताच सर्व काही सांगून जात आहे.





