नाशिक | Nashik
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांना (MP) आपल्या गटात सामील करून घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानंतर आता नाशिक महापालिकेच्या राजकारणातही ‘ऑपरेशन टायगर -३’ची जोरदार चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटातील १० ते १२ नगरसेवक शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही नगरसेवकांच्या (Shivsean UBT Corporators) शिंदेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका झाल्याची चर्चा आहे. प्रभागनिहाय विकासासाठी विशेष निधी देण्याचे आमिष दाखवल्याच्याही चर्चा रंगल्या असून, ठाकरे गटातील एका प्रमुख नेत्याच्या संभाव्य पक्षांतराबाबतही तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. दरम्यान या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे माजी आमदार आणि नाशिक संपर्कप्रमुख (Communication Chief) रवींद्र मिर्लेकर हे तातडीने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
मिर्लेकर यांनी आज (शनिवारी) पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवकांची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत रवींद्र मिर्लेकर (Ravindra Mirlekar) ऑपरेशन टायगरच्या (Operation Tiger) पार्श्वभूमीवर बैठकीत नगरसेवकांना काय संदेश देतात? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. या राजकीय घडामोडींमुळे नाशिकचे राजकारण ऐन पावसाळ्यात चांगलेच तापल्याचे दिसत आहे. दरम्यान नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर शुक्रवारी दोन्ही शिवसेनेच्या गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिले होते.
शिंदे सेनेचे अजय बोरस्ते काय म्हणाले होते?
या चर्चावर बोलताना शिंदेसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्रिपदाच्या काळापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर शिवसैनिकांचा विश्वास आहे. अनेकांना त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळात संपर्कमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांच्यासोबत विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या भेटी झाल्या होत्या. त्यामुळे भविष्यात काही घडले तर ते नाकारता येणार नाही. मात्र, नगरसेवकांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत कोणतीही अधिकृत हमी दिलेली नाही, नाशिकच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे ते म्हणाले होते.
ठाकरे सेनेचे गटनेते काय म्हणाले?
दुसरीकडे ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे यांनी या सर्व चर्चांचे खंडन करत म्हटले की, आमच्या नगरसेवकांना विकास निधी कमी मिळतो, हे खरे आहे. अनेक कामांसाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करूनही वेळेवर दखल घेतली जात नाही. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याची भावना आहे. अधिक निधीचे आमिष दाखवून नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा निराधार आहेत. आमच्या पक्षाचा एकही नगरसेवक फुटणार नाही. उलट असा प्रयत्न करणार्यांना मतदारच ऑपरेशन तुडवातून उत्तर देतील, असे पोरजे यांनी स्पष्ट केले होते.




