नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्य शासनाने (State Government) हिंदी भाषा सक्तीबाबतचा जीआर मागे घेतल्यानंतर मुंबईत (Mumbai) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे आनंदोत्सव साजरा केला होता. या कार्यक्रमामुळे दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये संभाव्य युतीची चर्चा रंगली होती. मात्र, आज इगतपुरी येथे झालेल्या मनसेच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर अनौपचारिक गप्पांवेळी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत संभ्रम वाढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांवेळी मुंबईत झालेल्या मेळावा (Melava) फक्त मराठी भाषेसाठी आणि जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी होता. त्याचा राजकारणाशी कुठलाही संबंध नव्हता. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी घेतला जाईल, असे म्हटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नसली तरी सध्या मनसे आणि शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाच्या युतीसंदर्भात अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे बोलले जात आहे. त्यातच राज ठाकरेंनी आज अनौपचारिक गप्पांवेळी केलेल्या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंमध्ये खरंच युती होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चां रंगत आहे.





