नाशिक | Nashik
जिल्ह्यात (Nashik District) नगर पंचायत, नगर परिषद निवडणुकांच्या मतदानाआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज (मंगळवारी) आपल्या समर्थकांसह मुंबईतील पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हिरे यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.
यावेळी हिरे म्हणाले, “मला पक्षात प्रवेश करण्याचाही संधी दिली त्याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानतो. मालेगावात शतप्रतिशत भाजपसाठी (BJP) आम्ही तयार असून, मालेगाव आणि नांदगावमध्ये पक्षाचाच महापौर बसेल. तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अधिक जागा जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करू”, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा : Nashik Politics : ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; उपनेते अद्वय हिरे हाती घेणार कमळ
दरम्यान, अद्वय हिरे यांच्याविरोधात चौकशीचा ससेमीरा लागला होता. ते त्या गोष्टीला सामोरे देखील गेले होते. यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून हिरे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. याआधी अद्वय हिरे भाजपातच होते. त्यांनी भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी २०२४ मध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघातून शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मालेगावच्या राजकारणात हिरे कुटुंबियांची ताकद आहे. आता अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशाने भाजप आणखी मजबूत झाला आहे.
कोण आहेत अद्वय हिरे?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरात हिरे घराण्याचा प्रचंड दबदबा आहे. २००४ साली अद्वय हिरे यांचे वडील प्रशांत हिरे यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा त्यावेळी राजकारणात नवखे असलेल्या दादा भुसेंनी पराभव केला होता. २००९ मध्ये देखील दादा भुसे मालेगाव बाह्य मतदारसंघातून विजयी झाले.पुढे हिरेंना २०१४ नंतर भाजपमधील कामकाज आणि मोदींच्या नेतृत्वाची ओढ निर्माण झाली. त्यामुळे अद्वय आणि अपूर्व हिरे या दोन्ही बंधूंनी भाजपमध्ये प्रवेश करत आपल्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर अद्वय हिरे यांनी जानेवारी २०२३ ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मालेगावच्या राजकारणात आपल्या नवीन इनिंगची सुरुवात केली होती. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या दादा भुसे यांना कडवे आव्हान दिले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आज अद्वय हिरे यांनी पुन्हा एकदा भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा भुसे विरुद्ध हिरे हा राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.





