नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कालपासून (मंगळवार) सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Rain) रात्रभर जोरदार वर्षाव केला. नाशिक शहरासह (Nashik City) ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील (District) प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला असून, गंगापूरसह इतर धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणातून (Gangapur Dam) २ हजार ५५७ क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने या विसर्गात वाढ केली जाणार असल्याने नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज बुधवारचा साप्ताहिक बाजार असल्याने व्यापार्यांनाही प्रशासनाने (Administration) तातडीने सावधानतेचे निर्देश दिले आहेत.
तसेच नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे पाण्याबरोबरच पानवेली देखील रामकुंड परिसरात वाहून आले आहेत. संपूर्ण रामकुंड परिसर पानवेलींनी व्यापला आहे. तर गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याने वेढा द्यायला सुरुवात झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले आहे.
नाशिकला रेड अलर्ट
आज दुपारनंतर पावसाचा जोर ओसरणार असून, उत्तर महाराष्ट्रातील (Uttar Maharashtra) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यात नाशिक, पुणे, साताऱ्यातील घाट माथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पालघर, रायगड, रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाण्यात खबरदारी म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत आज मोठा पाऊस होणार नसला तरी खबरदारी म्हणून हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. परिणामी यंत्रणांना सतर्क ठेवण्यासाठी हवामान विभागाकडून हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.




