Saturday, October 24, 2026
HomeनाशिकNashik Rain News: महादेववाडी पूल पाण्याखाली; मळे परिसराला जोडणारा रस्ता बंद

Nashik Rain News: महादेववाडी पूल पाण्याखाली; मळे परिसराला जोडणारा रस्ता बंद

सातपूर | प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नंदिनी नदीला मोठा पूर आला असून नदीवरील महादेववाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी मंडई ते मळे परिसराकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच त्र्यंबक रस्त्यावर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हा मार्गही सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

सततच्या पावसामुळे मळे व शेत परिसरातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नंदिनी नदीत दाखल झाल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. पिंपळगाव परिसरात पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणीही पाण्याचा प्रवाह अधिक वेगाने वाहत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

नदीवरील वाढलेले पाणी सर्वप्रथम महादेववाडी येथील पुलावरून वाहू लागल्याने महादेववाडी परिसराला धोक्याचा इशारा दिला आहे. नदीकाठावरील घरांना पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरम्यान, नगरसेविका सुवर्णा मोराळे यांच्या प्रयत्नातून काही वर्षांपूर्वी महादेववाडी पुलाची उंची वाढविण्यात आल्याने परिसरातील पुराचा धोका कमी झाला होता. मात्र यंदा पावसाचा जोर अधिक असल्याने पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पुलाखाली गाळ व कचरा साचल्याने पाण्याचा प्रवाह अडथळला असावा, अशी शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

महादेववाडी पूल बंद झाल्यामुळे मळे परिसर आणि सातपूर गाव यांचा थेट संपर्क तुटला असून नागरिकांना त्र्यंबक रोडमार्गे मोठा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे.

पडसाद : ढगफुटीच, पण सोशल मीडियातील…!

त्र्यंबक रस्ताही बंद
नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने त्र्यंबक रस्त्यावर पाणी साचले आहे. या ठिकाणी नाल्याची क्षमता वाढविण्यासाठी नवीन पाइप टाकण्याचे काम सुरू असले तरी कालच्या मुसळधार पावसात ही व्यवस्था अपुरी ठरल्याचे स्पष्ट झाले. रस्त्यावरील पाणी आणि सुरू असलेल्या बांधकामामुळे हा मार्ग धोकादायक बनल्याने प्रशासनाने त्र्यंबककडे जाणारी व येणारी वाहतूक बंद केली आहे.

मनपा महसूल कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाने दोन्ही ठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याचा निचरा होण्याची शक्यता असली तरी संततधार पाऊस सुरू असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण ताब्यात

0
​त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळवाडे शिवारात असलेल्या एका रिसॉर्टमध्ये बनावट नोटा तयार करून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश...