Tuesday, May 5, 2026
HomeनाशिकNashik Rain Update: शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; गोदापात्राजवळ चारचाकी वाहन पाण्यात अडकले,...

Nashik Rain Update: शहरात पावसाची जोरदार बॅटिंग; गोदापात्राजवळ चारचाकी वाहन पाण्यात अडकले, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

नाशिक | Nashik
नाशिक शहरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गोदावरीला यंदाच्या मोसमातील पहिला पूर आला आहे. याच गोदावरी नदीच्या पुरात कार अडकल्याची घटना घडली आहे. गोदावरी नदी लगत असलेल्या रोकडोबा पटांगणावर पार्क केलेली हे चारचाकी वाहन पाण्यात अडकले आहे. तसेच नाशकात रामकुंड परिसरातील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.

नाशिकला गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे शहरातील मान्सून पूर्व सफाईचा फज्जा उडाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. रस्त्यांना तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. गुडघाभर पाण्यातून वाहचालकांना वाट काढावी लागत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. तर जुने नाशिक, नविन नाशिक, नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड, कॉलेज रोड, देवळाली भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याचे पहायला मिळाले.

- Advertisement -

दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला लागले पाणी
शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसाचा जोर कायम आहे. दुपारी गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीला पूर आला असून नाशिकच्या ऐतिहासिक दुतोंड्या मारुतीच्या कंबरेला पाणी लागले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास गोदावरीची पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक महापालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याने परिसरात वाहने पार्क करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर हवामान विभागाने नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते.

दारणा धरणातून पहिला विसर्ग
जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून धरण ५० टक्के भरले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणा पॉवर हाऊसमधून सुमारे ११०० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या