पुणे | Pune
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. शहरातील गोळीबार, कोयता हल्ले, खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांचा संदर्भ देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यातील गुन्हेगारी परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेतून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या सत्र न्यायालयाच्या जवळ बुधवारी (25 नोव्हेंबर) सहा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तीव्र हत्यारांनी वार करत हल्ला केला. न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या घटनेत मंदार किवळे हा 35 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. मात्र दिवसाढवळ्या न्यायालयाच्या परिसरात या घडलेल्या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या कार्य पद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले असून यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा पाढाच वाचून दाखवला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, गेल्या दोन- अडीच वर्षातील पुण्याच्या घटनांकडे लक्ष दिले तर जे पुणे कधीकाळी सुसंस्कृत, विद्येचे माहेरघर, संस्कृतीच माहेरघर म्हणून ओळखलं जायचं ते आता पुण्यनगरीची कोयता नगरी होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास झाला आहे. ज्या पुण्याला पेंशनर लोकांचे शहर म्हणून ओळखले जायचे, ते शहर आता गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जाते की काय, अशी भीती निर्माण होत आहे, असे म्हटले. यावेळी त्यांनी पुण्यातील घटनांचा पाढाही वाचून दाखवला.
अंधारे यांनी म्हटले की, 20 मे 2026 ला अक्षय म्हस्केवर गोळीबार झाला आणि त्यावर कोयता हल्ला झाला. त्यापाठोपाठ लगेचच आंदेकर – कोमकर गँगचा गँगवॉर होता, त्याचा थरार ऐन गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांनी अनुभवला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात, उत्सवाच्या काळात आपण बाहेर पडू शकू का? गर्दीच्या काळात असे वातावरण असेल तर काय करायचे? हिंजवडीच्या आयटी इंजिनिअर कोमल डहाके या महिलेचा खून 24 नोव्हेंबर 2026 झाला. विप्रोमध्ये काम करणाऱ्या कोमलला ओळखीच्या व्यक्तीने भिंतीवर डोके आपटून मारले. ही सुद्धा घटना सार्वजनिक ठिकाणी घडली. विशेष म्हणजे भर दुपारी बुधवारी घटना घडली.
महिला सुरक्षित नाही, आयटी कर्मचारी सुरक्षित नाहीत कोर्टाच्या आवरत नागरिक सुरक्षित नाहीत, मंदार किवळे याला कोर्ट न्याय देईल, पण आता कोर्टावरचा विश्वासच लोकांचा उडवला आहे का? असे प्रश्न उपस्थित होतात. मुख्यमंत्री यांना लागलेली एटीकेटी अनेक ठिकाणी फेल ठरले आहेत, आरोपी गुन्हेगार यांना आपल्या पक्षात कसं घेता येईल असे चालले आहे, घोसाळकर, पुर्णेकर, देशमुख प्रकरणावरून समोर आले आहे, अशी टीका त्यांनी केली.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे, अशी मागणी अंधारे यांनी केली. अजित पवार पालकमंत्री पदावरून गेल्यानंतर गुंडा पुंडांना राजश्रय दिला जातो. सुनेत्रा पवार यांना माझा प्रश्न आहे अजून किती दिवस पुणेकर अमितेशकुमार यांच्या भरवशावर चालणार आहेत. गृहमंत्री संपूर्ण अपयशी आहेत . सातपुते मॅडम यांनी आतापर्यंत काय केलं केले, असा सवाल अंधारे यांनी विचारला.




