नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कार आणि धर्मांतराच्या प्रयत्नासारख्या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) ही गर्भवती असून, कारागृहातील परिस्थितीमुळे तिची प्रकृती बिघडत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Nashik Road Seassion Court) निदा खान हिची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश कारागृह प्रशासन आणि पोलिसांना दिले आहेत.
या खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीवेळी सर्व संशयितांची (Suspect) मध्यवर्ती कारागृहातून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ (व्हीसी) द्वारे न्यायालयात हजेरी लावण्यात आली होती. यावेळी संशयित निदा खान हिच्या वतीने वकील प्रतिक ताजनपुरे यांनी नवीन वकिलीपत्र सादर केले. निदाच्या वकिलांनी न्यायालयात तिच्या आरोग्याचा मुद्दा गंभीरपणे मांडला. निदा खान सध्या गर्भवती असून तिच्या शरीरातील लोहाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. कारागृहात तिला क्षमतेपेक्षा जास्त जड कामे करावी लागत असल्यामुळे तिच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात झालेला असल्याने, सध्याच्या परिस्थितीत तिला विशेष वैद्यकीय उपचारांची आणि विश्रांतीची नितांत गरज आहे. त्यामुळे न्यायालयाने हा युक्तिवाद गांभीर्याने घेत मध्यवर्ती कारागृहातून निदाचा वैद्यकीय अहवाल मागवला असून, तिची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तर, छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) एमआयएम (एमआयएम) पक्षाचा नगरसेवक मतीन पटेल आणि घरमालक हानिफ शेख यांना शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (सहसंशयित केले आहे. निदाला लपण्यासाठी मतीन पटेल यानेच हानिफचे घर उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. दुसरीकडे, मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने या प्रकरणातील संशयित दानिश शेख याला जाहीर पाठिंबा दिला आहे. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आशिफ शेख यांनी दानिशला थेट कायदेशीर आणि वकिली मदत पुरवल्याने या प्रकरणातील राजकीय हस्तक्षेप स्पष्ट झाला आहे.
संशयितांकडून वकील बदलण्याचा सपाटा
या हायप्रोफाइल खटल्यात संशयितांकडून सातत्याने वकील बदलले जात असल्याचे चित्र आहे. आधी मुख्य संशयित दानिश शेख याने आपला वकील बदलला होता, त्यानंतर आता निदा खान हिनेही आपला वकील बदलला आहे. संशयितांच्या या भूमिकेमुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे आता या खटल्याची पुढील सुनावणी थेट २२ जुलै रोजी होणार आहे.
२५ जूनच्या जामीन अर्जाकडे सर्वांचे लक्ष
निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार हे तिघेही सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर नुकतीच सरकारी वकील आणि बचाव पक्षातर्फे तब्बल तीन तास जोरदार खडाजंगी झाली. या नाट्यमय युक्तिवादानंतर न्यायालयाने जामिनावरील निकाल २५ जून रोजी देण्याचे निश्चित केले आहे.




