नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील तरुणीवर झालेल्या अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाच्या तपासात मुख्य संशयित निदा एजाज खान हिने केवळ गुन्ह्यात मदत केली नाही, तर पीडितेचे ‘मतपरिवर्तन’ करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे विशेष तपास पथकाच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.
एसआटीच्या तपासात निदा खानच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिने पीडितेच्या मोबाईलवर तब्बल १७१ वादग्रस्त लिंक्स पाठवल्या होत्या. या लिंक्सच्या माध्यमातून पीडितेच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल न्यूनगंड निर्माण करणे आणि विशिष्ट धर्माबद्दल आकर्षण निर्माण करण्याचे ‘ब्रेनवॉशिंग’ सत्र राबवण्यात आले. या डिजिटल पुराव्यांमुळे धर्मांतरासाठी वापरले जाणारे हे नवे ‘मॉडेल’ पाहून यंत्रणेला धक्का बसला आहे.
देवळाली कॅम्पमधील पीडितेची मूळ ओळख पुसून टाकण्याचा कट निदाने रचला होता. पीडितेचे नामकरण ‘हानिया’ असे केले होते. इतकेच नाही, तर निदा स्वतः पीडितेच्या घरी जाऊन तिला विशिष्ट धर्माचे शिक्षण देणे, धार्मिक पेहराव परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थनांची सक्ती करणे, अशा कृती करत होती. पीडितेला पूर्णतः प्रभावाखाली घेण्यासाठी निदाने जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Nida Khan: किराणा, चिकन, रोजचा खर्च कोण करत होतं? निदाच्या ४३ दिवसांचा लक्झरी वनवासाचा पर्दाफाश
आता तिघांची ‘फेस-टू-फेस’ चौकशी
या गुन्ह्यातील मुख्य संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या दोघांचा ताबाही आता एसआयटी घेणार आहे. निदा, दानिश आणि तौसिफ या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. यातून या रॅकेटचे धागेदोरे आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहेत का, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मुंबई नाका पोलिसांनी या प्रकरणात कट रचणे आणि धार्मिक भावना दुखावण्याबाबतच्या कलमांत वाढ केली आहे. निदा खानची पोलीस कोठडी सोमवारी (दि. ११) संपत असून, जप्त केलेल्या १७१ लिंक्सचा तांत्रिक तपास आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी एसआयटी तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयाकडे करणार आहेत.
‘त्या’ फ्लॅटचे गूढ कायम
२६ मार्चपासून पसार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचा नगरसेवक मतीन माजिद पटेल याने आश्रय दिला होता. सुरुवातीला हा फ्लॅट निदाच्या नातेवाईकाचा असल्याचे सांगितले जात होते, मात्र पोलिसांच्या पडताळणीत निदाचा त्या फ्लॅटशी कोणताही संबंध नसल्याचे समोर आले आहे. निदा गर्भवती असतानाही तिला मिळलेला हा आश्रय आणि त्या काळात तिला झालेला अर्थपुरवठा नक्की कोणाकडून झाला, याचा शोध ‘एसआयटी’ आता घेत आहे.





