Saturday, April 25, 2026
Homeक्राईमNashik Crime News : 'डिजिटल पाठलाग' उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन्...

Nashik Crime News : ‘डिजिटल पाठलाग’ उघड; रझा, शफिकच्या मोबाईलमधील चॅटिंग अन् सोशल मीडिया रडारवर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

टीसीएस कंपनीतील (TCS Company) काही महिला कर्मचार्‍यांच्या लैंगिक छळवणुकीसह धर्मांतरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणातील संशयित रझा रफिक मेमन आणि शफी भिकन शेख यांनी पीडितेचा केवळ शारीरिकच नव्हे, तर डिजिटल पाठलाग करून अश्लील मेसेजेसद्वारे त्रास दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने (Court) दोघांच्या पोलीस कोठडीत २० एप्रिलपर्यंत वाढ केली असून, संशयितांचे मोबाईल जप्त करून त्यातील ‘डेटा’चे गुपित उघड करण्यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.

- Advertisement -

एसआयटीने (SIT) संशयित रझा मेमन याच्याकडून त्याचा मोबाईल जप्त केला आहे. या प्रकरणातील तपासाचा सर्वांत महत्त्वाचा दुवा हा ‘डिजिटल पुरावा’ ठरणार आहे. संशयितांनी पीडितेला इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर वारंवार मेसेजेस करून तिचा पाठलाग केला होता. जप्त मोबाईलचे पॅटर्न लॉक उघडून त्यातील डिलिट केलेला डेटा रिकव्हर केला जाणार आहे. पीडितेसह इत्तर महिला कर्मचाऱ्यांशी संशयितांनी केलेले संवाद, अश्लील वक्तव्ये आणि पाठवलेले व्हिडिओ यांचा तपास सुरू झाला आहे. शिवाय, संशयितांनी कार्यालयातील इतर महिलांशी धार्मिक उद्देशाने काही गैरकृत्ये केली आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

शनिवारी (दि. १८) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. सी. नरवाडिया यांच्यासमोर ही सुनावणी ‘इन कॅमेरा’ पार पडली.तपासाधिकारी एपीआय कल्पेश दाभाडे यांनी तपासाची व्याप्ती मोठी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी पक्षातर्फे सहायक संचालक किरण बेंडभर आणि सहायक सरकारी अभियोक्ता अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला. तर संशयितांच्या बाजूने वकील बाबा सय्यद, हानिद शेख यांनी युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने रझा आणि शफी यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई नाका आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल असून, यात ८ महिला आणि एका पुरुष फिर्यादीचा समावेश आहे. आतापर्यंत संशयित दानिश शेख, आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी आणि एजीएम अश्विनी चैनानी हे कारागृहात असून, डिजिटल (Digital) पुराव्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कोणापर्यंत पोहोचतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समिती दाखल

या प्रकरणानंतर, राष्ट्रीय महिला आयोगाची ‘तथ्य शोध समिती’ शनिवारी नाशकात दाखल झाली. नाशिकरोड परिसरातील महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा) येथे समितीने बैठक घेतली. पुढील तीन दिवस ही समिती शहरात तळ ठोकून असणार आहे. या समितीत मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक बी, के, सिन्हा, सवर्वोच न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक सुश्री लीलावती यांचा समावेश आहे.

निदाच्या अर्जावर सोमवारी सुनावणी

या संपूर्ण प्रकरणातील संशयित व मुख्य सूत्रधार संशयित निदा एजाज खान अद्याप पोलिसांना गुंगारा देत आहे. तिने वकील राहुल कासलीवाल यांच्यामार्फत शनिवारी (दि. १८) तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला असून, त्यावर सोमवारी (दि. २०) सु-नावणी होणार आहे. निदा ही तीन महिन्यांची गर्भवती असून, ‘एसआयटी’ ने तिच्या पतीचा मुंब्रा येथे जबाब नोंदवला आहे. मात्र, तिचे अद्याप न सापडणे हा पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. देवळाली कॅम्प पोलिसांत दाखल अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात निदा संशयित आहे.

ताज्या बातम्या