नाशिक 13 नाव्हेंबर 2026 (जिमाका वृत्तसेवा) :
नाशिक जिल्ह्यातील रिक्त १५५ महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरती प्रक्रियेंतर्गत १५ नोव्हेंबर २०२६ रोजी तालुकास्तरावर आयोजित करण्यात आलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शासनाच्या सुधारित कार्यक्रमानुसार ही परीक्षा आता १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील रिक्त १५५ महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी १७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी nashik.kotwal.org या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान, शासनाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२६ पासून संबंधित शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत ज्या भरती प्रक्रियांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत; मात्र निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही, अशा भरती प्रक्रियांना सामान्य प्रशासन विभागाच्या २५ एप्रिल २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विहित कमाल वयोमर्यादेत एक वर्षाची शिथिलता देण्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर वयोमर्यादा शिथिलतेची तरतूद महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीस लागू होते किंवा कसे, याबाबत संबंधित विभागाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तोपर्यंत सुरू असलेली भरती प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश महसूल विभागाने दिले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, सुधारित कार्यक्रमानुसार ती १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी इतर अफवांवर विश्वास न ठेवता भरती प्रक्रियेबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय अथवा भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती प्राप्त करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.



