नाशिक | प्रतिनिधी
शहरातील रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून, अवघ्या काही दिवसांत झालेल्या अपघातांत चौघांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलापासून ते ६७ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंतचा समावेश आहे. बेदरकार एसटी बस, भरधाव कारची धडक, दुचाकीवरील अपघात आणि हिट अँड रनच्या घटनांनी रस्ते सुरक्षेचा अश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघातांमुळे कुणाचा घरातील आधार हरपला, तर कुणाच्या कुटुंबाने मुलगा गमावला आहे.
उपनगर येथील प्रगती कॉलनीतील रहिवासी सुरेखा अरविंद जाधव (६७) या ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास द्वारका सर्कल परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी एसटी महामंडळाच्या बसचालक महेंद्र साहेबराव शेवाळे (रा. वराणे गाव, ता. मालेगाव) याने बस बेदरकारपणे चालवून त्यांना धडक दिली. त्या बसच्या पुढील डाव्या चाकाखाली आल्याने त्यांच्या छाती व पोटाला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पंकज जाधव यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ रोडवरील कुमावतनगर येथील गणेश संतोष ढिकले (१७) हा ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बापूपुलाजवळ दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूत रक्तस्राव झाला. त्याला पेठ रोडवरील नामको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पाच दिवसांच्या उपचारांनंतर ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आडगाव येथील श्रीरामनगर परिसरात राहणारे हितेश प्रकाश कोठावदे (३३) हे ११ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मोपेडवरून मुंबई-आग्रा महामागनि विल्होळीकडे जात होते. गरवारे पॉइंट येथे पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे दाजी भूषण येवला यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
ब्लॅक स्पॉटवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
द्वारका सर्कल, मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉइंट, बापूपुल आणि त्रिमूर्ती चौक हे वर्दळीचे तसेच अपघातप्रवण ठिकाणे म्हणून ओळखले जातात. या भागांत झालेल्या अपघातामुळे वाहनांचा वेग, पादचाऱ्यांची सुरक्षा आणि अल्पवयीन मुलांकडून वाहनांचा वापर या बाबी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अपघातप्रवण ठिकाणी वेगनियंत्रण, वाहतूक नियोजन आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
त्रिमूर्ती चौकात हिट अँड रन
सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुकृपा रुग्णालयासमोर ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास अज्ञात भरधाव वाहनाने पायी जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीला धडक देऊन पळ काढला, गंभीर जखमी अवस्थेत गितेश कानडे यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ११ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून, याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.




