नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था
रशियाच्या (Russia) कॅमचटका द्वीपकल्पाजवळ ८.७ तीव्रतेचा रिश्टर स्केल भूकंप झाला आहे. भारतीय वेळेनुसार ३० जुलै सकाळी ४.५४ वाजता आलेल्या या भूकंपाने (Earthquake) संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाची नोंद इतिहासातील आठव्या सर्वात मोठ्या भूकंपांपैकी एक म्हणून झाली आहे. रशियातील या शक्तिशाली भूकंपाच्या हादऱ्यानंतर सोशल मीडियावर अनेक थरकाप उडवून टाकणारे व्हिडीओ समोर आले आहेत.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, या भूकंपाचे केंद्र कॅमचटकाच्या पूर्वेकडील प्रशांत महासागराच्या किनाऱ्यापासून सुमारे १३६ किलोमीटर अंतरावर, पेट्रोपावलोव्स्क-कॅमचत्स्कीच्या आग्नेयेला होते. तर भूकंपाची खोली १८.२ किलोमीटर इतकी होती, ज्यामुळे त्याची तीव्रता अधिक जाणवली. या भूकंपामुळे रशिया, जपान, गुआम, हवाई आणि अलास्कासह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रशियातील या भूकंपामुळे इमारती (Budling) हालू लागल्या होत्या. तर घरातील सर्व वस्तू जोर जोरात खाली पडू लागल्या, दरवाजे आपटू लागले, खिडक्यांच्या काचा फुटल्या. या घरांमध्ये असणाऱ्या महिला किंचाळताना आणि ओरडताना दिसत आहे. भूकंपाचे कारण प्रशांत आणि ओखोत्स्क समुद्राच्या प्लेट्सचे एकत्र येणे असून, ही प्रक्रिया कुरिल-कॅमचटका खंदकामध्ये घडते. २० जुलै रोजी याच परिसरात ७.४ तीव्रतेचा एक छोटा भूकंप (फॉरशॉक) झाला होता, तर मुख्य भूकंपापाठोपाठ ७.० तीव्रतेचा आफ्टरशॉकही नोंदवला गेला. तसेच भूकंप आणि त्सुनामीच्या धोक्यानंतर, रशियाच्या सखालिन प्रदेशातील सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, या भूकंपाच्या एका व्हिडीओत एक महिला (Woman) मोबाईलच्या दुकानामध्ये खुर्चीवर बसून काम करत होती. भूकंपाचा हादरा बसल्यानंतर त्या दुकानामधील सर्व सामान आणि कपाट खाली पडले. या महिलेच्या अंगावर सर्व वस्तू पडल्या. त्यानंतर ही महिला दुकानातील टेबलखाली लपून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. दुकानामध्ये लावललेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली. ही महिला जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडताना दिसत आहे. याशिवाय अशाच प्रकारच्या अनेक व्हिडीओमध्ये महिला जीव वाचवण्यासाठी ते इकडे तिकडे पळताना दिसत आहेत.




