Friday, September 11, 2026
Homeदेश विदेशVikram-1 Launched : भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! पहिल्या खासगी 'विक्रम-१' रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

Vikram-1 Launched : भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप! पहिल्या खासगी ‘विक्रम-१’ रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण

अमेरिका, चीननंतर भारत जगातील तिसरा देश

नवी दिल्ली | New Delhi

भारताने अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा नवा इतिहास रचला आहे. हैदराबाद येथील ‘स्काईरूट एयरोस्पेस’ (Skyroot Aerospace) या खाजगी स्पेस स्टार्टअप कंपनीचे ‘विक्रम-१’ (Vikram-1) हे रॉकेट आपल्या पहिल्या ऑर्बिटल मिशनसाठी यशस्वीरित्या झेपावले आहे. तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला प्रक्षेपणाला काहीसा उशीर झाला, मात्र सर्व आव्हानांवर मात करत रॉकेटने अवकाशात यशस्वी भरारी घेतली. या ऐतिहासिक कामगिरीमुळे स्वतःच्या बळावर खाजगी रॉकेट लाँच करणारा भारत हा अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसरा देश ठरला आहे.

- Advertisement -

डॉ. विक्रम साराभाई यांना अनोखी मानवंदना

भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या पहिल्या खाजगी रॉकेटचे नाव ‘विक्रम-१’ असे ठेवण्यात आले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या (ISRO) सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. सुमारे ७ मजली उंचीचे हे रॉकेट पृथ्वीपासून साधारण ४५० किलोमीटर उंचीवर असलेल्या लो अर्थ ऑर्बिटमध्ये (Low Earth Orbit) उपग्रहांना प्रस्थापित करण्यासाठी रवाना झाले आहे.

ऑर्बिटल रॉकेट नेमकं काय आहे?

अंतराळ विज्ञानात ‘सब-ऑर्बिटल’ आणि ‘ऑर्बिटल’ रॉकेटमध्ये मोठा फरक असतो. सब-ऑर्बिटल रॉकेट केवळ अवकाशात जाऊन परत येते. याउलट, ऑर्बिटल रॉकेट उपग्रहाला इतका प्रचंड वेग देते की तो पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहतो. यापूर्वी स्काईरूटने सब-ऑर्बिटल उड्डाण केले होते, मात्र आता थेट उपग्रह कक्षेत स्थापित करणारे ‘ऑर्बिटल’ रॉकेट एका भारतीय खाजगी कंपनीने यशस्वी करून दाखवले आहे. आतापर्यंत खाजगी क्षेत्रात अशी गौरवशाली कामगिरी केवळ अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांनाच साध्य करता आली होती. स्काईरूट एयरोस्पेसच्या या यशामुळे आता भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्राला (Private Space Sector) मोठी गती मिळणार असून जागतिक पातळीवर भारताची मान अधिक उंचावली आहे.

काय आहे ‘विक्रम-१’ रॉकेटची वैशिष्ट्ये?

चार टप्प्यांचे रॉकेट : हे रॉकेट एकूण चार टप्प्यांचे (Stages) आहे. यातील पहिल्या तीन टप्प्यांमध्ये ‘ठोस इंधनाचा’ (Solid Fuel) वापर करण्यात आला आहे.

लिक्विड फ्यूल इंजिन : रॉकेटच्या चौथ्या टप्प्यात ‘लिक्विड फ्यूल इंजिन’ बसवण्यात आले आहे. गरज पडल्यास हे इंजिन अंतराळात पुन्हा सुरू (Restart) केले जाऊ शकते, ज्यामुळे उपग्रहाला त्याच्या निर्धारित कक्षेत अचूकपणे पोहोचवण्यास मदत होते.

स्मॉल सॅटेलाइट्ससाठी उपयुक्त : हे रॉकेट प्रामुख्याने लहान उपग्रहांचे (Small Satellites) व्यावसायिक प्रक्षेपण करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : ना. विखे यांच्यावरील एकेरी टीका खपवून घेणार नाही, जरांगेंना...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वर्षभर सातत्याने प्रयत्न करून अनेक...