नवी दिल्ली | New Delhi
नीट पेपरफुटी प्रकरणावरून (Neet Exam Paper Leak) देशभरात विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाल्यानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली जंतरमंतर येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या वाढत्या दबावामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून वातावरण चांगलेच तापले होते. याप्रकरणी आज (सोमवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायमूर्तींनी दिल्ली पोलीस आणि आंदोलक दोघांच्याही भूमिकेवर अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत.
शांततापूर्ण आंदोलनाचा घटनात्मक अधिकार
यावेळी न्यायालय (Court) म्हणाले की,”प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा संविधानाने दिलेला हक्क संरक्षित आहे आणि त्याचे रक्षण झालेच पाहिजे. केवळ आंदोलन होत आहे या कारणावरून पोलिसांच्या अत्याचाराचे किंवा लाठीचार्जचे समर्थन करता येणार नाही. पोलीस असो किंवा आंदोलक दोघांनीही केलेल्या मर्यादाभंगाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. जर पोलिसांनी अति-बळाचा वापर केला असेल, तर त्याची स्वतंत्र चौकशी झालीच पाहिजे” असे म्हटले. तसेच आंदोलन म्हणजे लाठीचार्ज नव्हे आणि आंदोलन म्हणजे हिंसाचारही नव्हे, असे स्पष्ट करत खंडपीठाने देशभरातील आंदोलने हाताळण्यासाठी एकसमान राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची (Uniform Guidelines) आवश्यकता असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
दोन्हीकडील हिंसाचार चिंतेचा विषय
सुनावणीदरम्यान पोलिसांवर (Police) झालेल्या हल्ल्याचा आणि जखमी अधिकाऱ्यांचा संदर्भ आला असता, खंडपीठाने दोन्ही बाजूंच्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली. पोलिसांना मारहाण झाल्याचे व्हायरल व्हिडिओ आणि विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज या दोन्ही घटना गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले.
सर्व याचिकांवर उद्या पुन्हा सुनावणी
दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बॅकफूटवर आलेल्या केंद्र सरकारला आणि दिल्ली पोलिसांना आता सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे. या प्रकरणाशी (Case) संबंधित सर्व याचिका उद्या (मंगळवारी) एकत्र सूचीबद्ध करून पुढील सुनावणी घेतली जाणार आहे.आजची सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पार पडली.




