मुंबई | Mumbai
राज्यात एकीकडे ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातही हालचालींना मोठा वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत पक्षातील रिक्त पदे भरण्याबाबत आणि काही महत्त्वाच्या पदांवर फेरनियुक्त्या करण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेअंती पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्ष पद भरण्यात येणार तर विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
आगामी निवडणुका आणि पक्षसंघटन बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे उपस्थित होते. आगामी काळातील राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी संघटनात्मक फळी अधिक मजबूत करणे हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता.
या बैठकीत पक्षाच्या विविध आघाड्यांच्या प्रदेशाध्यक्षपदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबाबत आणि काही जुन्या नेत्यांना मुदतवाढ देण्याबाबत सखोल चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत प्रामुख्याने पक्षाची रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार, पक्षाकडून महिला प्रदेशाध्यक्ष आणि युवक अध्यक्ष ही महत्त्वाची पदे नवीन चेहऱ्यांनिशी भरण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे, विद्यार्थी अध्यक्ष आणि युवती अध्यक्ष या पदांवर सध्या कार्यरत असलेल्यांनाच पुन्हा संधी देत त्यांची फेरनियुक्ती करण्यात येणार असल्याच्या चर्चा आहे.
देशभरात गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा आणि राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांचा वारस या बैठकीत पक्षाचे निवडला असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडवेंची वर्णी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
वैशाली नागवडे या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून पक्ष संघटनेत कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस यासारखी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. पुणे जिल्ह्यातील विशेषतः दौंड तालुक्यातील राष्ट्रवादीच्या सक्रिय नेतृत्वापैकी वैशाली नागवडे या एक आहेत. 2017 आणि 2020 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राहू-खामगाव (गट क्रमांक 48) मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती.
दरम्यान, ‘देवगिरी’वरील या मध्यरात्रीच्या खलबतांनंतर आता कोणत्याही क्षणी या नवीन नियुक्त्यांची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या या नव्या रचनेमध्ये पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमुळे आगामी काळात त्यांच्यावरही काही नवीन संघटनात्मक जबाबदारी सोपवली जाणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




