मुंबई । Mumbai
सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून वातावरण तापले आहे. यामध्ये परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.
भाजपचे आमदार सुरेश धसदेखील मुंडे यांच्या हकालपट्टीची सातत्याने मागणी करीत आहेत. सुरेश धस यांच्या आक्रमक भूमिकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जशास तसे उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी असून धनंजय मुंडेंवरचे आरोप म्हणजे मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. सध्या मस्साजोग प्रकरणात राजकारण सुरु आहे, बीडच्या अनेकांना धनंजय मुंडेंचा राजकीय काटा काढायचा आहे. सुरेश धस त्यांच्या प्रांताध्यक्षांचही ऐकत नाहीत.
संतोष देशमुखांच्या हत्येआधीच्या दोनदिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे, धस यांचा सीडीआर काढला पाहिजे, सुरेश धस यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच, सुरेश धस यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढणार आहोत. जानेवारी २००१ साली पाथर्डी तालुक्यातील एका गावात दरोडा, त्याच दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेही समोर आणणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले.