अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या युतीची सत्ता आली आहे. राज्यात आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव महापौर निवडला गेला आहे. हे स्वर्गीय अजितदादा पवारांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्याने निवडून आलेल्या महापौर ज्योती गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी डॉ. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत डांगे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले की, आम्ही सर्वजण अजितदादांकडे जाऊन नगरविकासासाठी मोठा निधी आणण्याचा विचार करत होतो. मात्र, त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. तरीसुध्दा नागरिकांनी पक्षांवर टाकलेला विश्वास कायम ठेवत शहराच्या विकासासाठी एकहाती सत्ता दिली आहे. प्रश्न अनेक आहेत, अडचणीही आहेत, परंतु आम्ही एकत्रितपणे त्यावर मात करू. महापालिकेतील पदाधिकारी व नगरसेवकांवर जबाबदार्या निश्चित केल्या जातील. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आधीच मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. उपनगरांच्या विकासालाही प्राधान्य दिले जाणार आहे. दिवसेंदिवस वाढणार्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी विकास आराखडा तयार करून प्रत्येक प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वी महापौर व उपमहापौर पदासाठी राजकीय घोडेबाजार होत असे; मात्र आता तो काळ संपला आहे. ठरावासाठी पैसे द्यावे लागतात, असे ऐकले होते, पण आता असा प्रकार होणार नाही. पारदर्शक व स्वच्छ कारभार करून नगरकरांचा विश्वास संपादन केला जाईल, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.




