मुंबई | प्रतिनिधी Mumbai
विधानसभा निवडणुकीत मिळाल्या दणदणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिलेच शिबीर आज, शनिवारपासून दोन दिवस अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीत होत आहे. राष्ट्रवादीने या अधिवेशनाला नवसंकल्प शिबीर म्हणून नाव दिले असून या अधिवेशनात पक्ष संघटना बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होऊन रणनीती ठरवली जाणार आहे.
अधिवेशनाला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिर्डीतील अधिवेशनाला आ.छगन भुजबळ उपस्थित राहणार किंवा नाही या बाबतचे वृत्त नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
अधिवेशनात पक्षाच्या नवीन सभासद नोंदणीचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच शहर, जिल्हा, तालुकापातळीवर सभासद नोंदणी योग्य पध्दतीने व्हावी यासाठी निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. राज्यात पावसाळ्यापूर्वी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका अपेक्षित आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाच्या विविध आघाडयांना वेगवेगळे कार्यक्रम दिले जाणार आहेत. याशिवाय अधिवेशनात काही महत्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश अपेक्षित आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी ही मागणी अजित पवार यांनी अनेकदा फेटाळून लावली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाकडून वारंवार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने यावर अधिवेशनात पक्षाच्या वतीने स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा