नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
NEET UG परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केले की, पुढील शैक्षणिक वर्षापासून NEET UG परीक्षा OMR शीटवर न होता पूर्णपणे कॉम्प्युटर-आधारित (Computer-Based Test) पद्धतीने घेतली जाईल. ३ मे रोजी नीट-यूजीचा पेपर झाला होता. मात्र, ७ मे रोजी ‘एनटीए’ला अशी माहिती मिळाली की, एका गेस पेपरमधील बहुतांश प्रश्न मुख्य परीक्षेत आले होते. या प्रकरणाच्या सखोल तपासानंतर त्यात गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, १२ मे २०२६ रोजी नीट-यूजीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज (१५ मे) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “पुढील वर्षापासून NEET परीक्षेच्या मूळ समस्येवर उपाय केला जाईल. OMR शीटऐवजी परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल.” पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागल्यानंतर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, “येणाऱ्या फेरपरीक्षेत कोणताही गैरव्यवहार होणार नाही,” असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला. कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याची मेडिकल सीट गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या विद्यार्थ्याला मिळू दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आणि यावर्षी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना १५ मिनिटे जास्तीचा वेळ दिला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.
२१ जूनला फेरपरिक्षा
यासोबतच, NEET UG 2026 ची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार असल्याची घोषणा करण्यात आली. या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) १४ जूनपर्यंत जारी केले जाणार आहेत. सरकारचा गैरप्रकारांबाबतचा दृष्टिकोन ‘झिरो टॉलरन्स’च राहणार असल्याचेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटी प्रकरणी बारकाईने लक्ष ठेवून
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी तातडीने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. “CBI आणि तपास यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे. सरकार, सर्व विभाग आणि वरिष्ठ नेतृत्व या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जे लोक भीती आणि गोंधळ निर्माण करत आहेत, त्यांनी आगामी परीक्षा प्रक्रियेपासून दूर राहावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही प्रधान यांनी दिला.




