बारामती | Baramati
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. पण त्यापूर्वीच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांच्या ट्विटमधून कुणाला निशाणा साधलाय, अशी चर्चा आता रंगली आहे.
रोहित पवारांचं ट्विट?
बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि अजितदादा…! आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं त्यांच्या अभिनंदनाचे बारामतीत मोठमोठे बॅनर दिसायचे… त्यावर #उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा #भावी_मुख्यमंत्री अशा ठसठशीत अक्षरात अजितदादांचा देखणा आणि राजबिंडा फोटो असायचा. ते पाहून मन आनंदाने भरुन यायचं आणि अभिमानही वाटायचा… पण आज?, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांच्या शेवटच्या वाक्याने सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. रोहित यांचा हा टोमणा कुणाला आहे? असा सवाल केला जात आहे.
अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस
डोंगराएवढ्या दुःखापुढं आज पहिल्यांदाच ना पदाचं कौतुक आहे… ना आनंदाचा जल्लोष…! गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाहीये, असं सांगतानाच आज बारामतीत अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर आहेत, पण हे लावणाऱ्या आणि अजितदादांवर अतीव प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, अजितदादा हे आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून ते कायम आपल्यातच राहणार..! त्यामुळं अजितदादांच्या नावापुढं स्वर्गीय शब्द लावण्याचं जसं धाडस माझ्यात नाही तसं आपणही करू नये.!, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेते पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी मांडलाय. तर या प्रस्तावाला पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलेय. परिणामी, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड झाली आहे. आता सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्यानंतर इथून पुढे सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा असणार आहे.





