Sunday, November 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Politics: शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंचं विलीनीकरणावर मोठं भाष्य, म्हणाले,...

NCP Politics: शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंचं विलीनीकरणावर मोठं भाष्य, म्हणाले, तर दोन्ही राष्ट्रवादी…

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर आपली भूमिका मांडली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षासमोर निर्माण झालेली परिस्थिती, नेतृत्व आणि भविष्यातील राजकीय दिशा यांवरून अनेक तर्कवितर्क सुरू असताना तटकरे यांच्या विधानाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसले असते
सुनील तटकरे यांनी सांगितले की, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नाही. मात्र, जर दिवंगत अजित पवार आज हयात असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे केव्हाच विलीनीकरण झाले असते. अजितदादांनी स्वतः आपल्याला या विलीनीकरणाची कल्पना दिली होती, असा दावाही तटकरेंनी केला. इतकेच नव्हे तर, जर आज दादा असते, तर येत्या १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्ष अधिकृतपणे एकत्र आले असते आणि आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध दिसली असती, असे त्यांनी म्हटल अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे ही संपूर्ण प्रक्रिया मागे पडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा विलीनीकरणाच्या चर्चा? दिवाळीनंतर १० तारखेला चर्चा करु, शरद पवार प्रफुल पटेलांमध्ये बातचित

सुनील तटकरे यांनी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतरच पुन्हा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू झाली. ‘या भेटीमध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. प्रफुल्ल पटेल तब्येतीची विचारपूस करायला गेले होते. त्यावेळी काही राजकीय चर्चा झाली असेल पण ती नेमकी कुठल्या संदर्भात असं काही भाग नाही. या भेटीचा कुणी राजकीय अन्वयार्थ काढू नये.’ असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

शशिकांत शिंदे म्हणाले…
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले, “सुनील तटकरेंनी सत्य परिस्थिती सांगितली. अजित पवार असताना विलिनीकरणाची चर्चा झाली होती. आज तटकरे म्हणत असले तरी आम्ही याबाबत यापूर्वीच आम्ही बोलत होतो, पण ती मानलं जात नव्हतं. ते तटकरे साहेब बोलल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालं. आज दोन्ही पक्ष एकत्र असते तर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका वगैरेचं चित्र वेगळं दिसलं असतं. दादांनाही तेच अपेक्षित होतं. पक्ष मजबुतीने ताकदीने उभा राहण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात हे शरद पवार आणि अजित पवारांना अपेक्षित होतं. त्यादृष्टीनेच विलिनीकरणाची चर्चा झाली होती.

दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, सुनील तटकरे यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले असून, आगामी काळात राजकीय वर्तुळात काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Chitra Wagh : शरद पवारांच्या भूमिकेचे कौतुक, तर रोहित पवारांवर निशाणा;...

0
नाशिक | Nashik सोमवार (दि.३० नोव्हेंबर) पासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार असून, या अधिवेशनात केंद्र सरकारतर्फे मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकासह तीन विधेयके मांडण्यात येणार...