मुंबई | Mumbai
इंधनाच्या दरात सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आज पुन्हा एकदा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करण्यात आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधी गेल्या आठवड्यातच पेट्रोलच्या किमतीत तब्बल ३ रुपयांची वाढ करण्यात आली होती. या धक्क्यातून सर्वसामान्य नागरिक सावरत नाहीत तोच आज पुन्हा इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटर ९१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटर ९४ पैशांनी महागले आहे. इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात एका आठवड्यात दुसऱ्यांदा इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसे यांचे ट्विट चर्चेत
चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है ! असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सामान्य माणसाची व्यथा मांडली आहे.
मागच्या वेळी पेट्रोल डिझेलच्या भावात घसघशीत ३ रुपये वाढवले होते. त्यामुळे लोकांनी केंद्रात सत्तेवर बसलेल्या भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत झोडपून काढले होते. या गोष्टीतून धडा घेत आज पेट्रोलचे दर ८७ पैशांनी तर डिझेलचे दर ९१ पैशांनी वाढवलेले दिसत आहे.
आज देशाची जी परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या दरात असंच कलेकलेने दरवाढ करेल असं दिसतंय. पण शेवटी काय ? पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा भुर्दंड हा सामान्य जनतेला सहन करायचाच आहे… चाकू खरबूजे पर गिरे या खरबूजा चाकू पर, कटना तो खरबूजे को ही है ! असा खोचक टोला खडसे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.





