Tuesday, September 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP Sharad Pawar: ठाकरे गटाच्या फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फुटीचे टेन्शन? पक्षात...

NCP Sharad Pawar: ठाकरे गटाच्या फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फुटीचे टेन्शन? पक्षात दोन गट पडल्याने पवारांसमोर मोठं संकट

मुंबई | Mumbai
एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये ठाकरे गटाचे सहा खासदार फोडण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत पातळीवर फुटीचे संकेत देणाऱ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भविष्यातील वाटचाल कशी असावी यावरुन पक्षात दोन गट पडले आहे. यापैकी एका गटाने काँग्रेसमध्ये विलिन होण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते आहे. तर पक्षातील दुसऱ्या गटाची एनडीएसोबत जाण्याची भूमिका आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळात या दोन गटांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचे समजते.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतील जागावाटप आणि भविष्यातील राजकीय हालचालींवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये दोन स्पष्ट गट पडले आहेत. यातील पहिल्या गटाची अशी ठाम भूमिका आहे की, पक्षाचे अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी आणि भाजपविरोधी लढाई मजबूत करण्यासाठी पक्षाने पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. या विलीनीकरणामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठी राजकीय ताकद निर्माण करता येईल, असा या गटाचा कयास आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तर दुसरीकडे पक्षातील दुसरा गट मात्र या विलीनीकरणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. या गटाच्या मते, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उभ्या केलेल्या या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले पाहिजे. एवढेच नव्हे तर, बदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा घेत पक्षाने थेट सत्ताधारी सरकारमध्ये सामील व्हावे, असाही एक मतप्रवाह या दुसऱ्या गटाने व्यक्त केला आहे. सत्तेत सामील झाल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळेल आणि पक्षाची पकड मजबूत होईल, असा अंदाज या गटाकडून बांधला जात आहे.

दरम्यान, आगामी काळात शरद पवार या दोन गटांपैकी कोणाचे ऐकणार हे बघावे लागेल. शरद पवार यांनी विरोधी पक्षात बसण्याची भूमिका कायम ठेवली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही आमदार फुटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे. त्यावेळी शरद पवार या आमदारांना कसे थोपवून धरु शकता, याचीही उत्सुकता सर्वांना आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांनी आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, शरद पवार गटातील अनेक आमदार हे सत्तेत जाण्यासाठी आसुसले असल्याच्याही चर्चा आहे. अशा परिस्थितीत शरद पवार आपला पक्ष एकसंध राखण्यात यशस्वी ठरणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या