मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीए आघाडीत सामील होणार आणि जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे. त्या अनुषंगाने जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने या चर्चेला उधाण आले आहे. यादरम्यानच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले. सुनील तटकरे यांनी म्हटले की, अर्थ खाते हे आमच्याकडेच राहावे याकरिता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. सुनेत्रा पवार यांच्यासह आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना त्यांनी म्हटले की, एखाद्या पक्षाला विशिष्ट गोष्ट मिळू नये, असे शिंदे बोलणार नाहीत.
सुनील तटकरे म्हणाले, जयंतराव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुरब्बी राजकारणी आहेत. ते सातवेळा विधिमंडळातून निवडून आले आहेत. त्यांनी दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व केले आहे. ते मुख्यमंत्र्यांना वेगळ्या कारणासाठी भेटू शकतात. मला या भेटीत काही वावगे वाटत नाही. शरद पवार हे गेली अनेक वर्षे राज्य आणि केंद्रातील राजकारणाचा प्रमुख घटक राहिले आहेत. त्यांचा पक्षही राष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा आणि कोणासोबत जायचे हा निर्णय घ्यायचा अधिकार असल्याचे मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
संपादकीय : १७ जुलै २०२६ – प्रधान सेवकांचे मौन, की उत्तरदायित्वाचा अपहार?
यावेळी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावरील दावा पुन्हा एकदा सांगितला. अर्थखातं राष्ट्रवादीला मिळावे, ही आमची मागणी आहे. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. ती भेट झाल्यावर आम्हाला इतर बाबींवरही चर्चा करायची आहे, असे सुनील तटकरे यांनी म्हटले. पवार साहेबांच्या पक्षातील सहकाऱ्यांच्या सत्तेतील सहभागाच्या चर्चा आहेत. पण मला याबाबत माहिती नाही. शेवटी सहा दशकं केंद्र आणि राज्याच्या राजकारणात पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्या पक्षाला त्यांच्या पद्धतीने वाटचाल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या पक्षाने कोणासोबत जावे, हा त्यांचा प्रश्न आहे, असेही सुनील तटकरे यांनी म्हटले.
‘अजितदादा असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या आणि अंतिम टप्प्यापर्यंत पोचल्याही होत्या. त्या सर्व चर्चा मला माहीत होत्या. परंतु दुर्दैवाने दादांचे निधन झाल्यावर विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या पक्षाची राज्य पातळीवरील बैठक झाली त्यावेळी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या विलीनीकरण विषयाला पूर्णविराम दिला. त्यामुळे नव्याने चर्चा कुठे सुरू झालेली नाही. त्यामुळे त्यावरही प्रतिक्रिया देण्याचे कारणच नाही’, अशी स्पष्टोक्तीही तटकरे यांनी केली.




