Saturday, June 13, 2026
Homeनगरहिवरे बाजारचा पाणलोट प्रकल्प आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर

हिवरे बाजारचा पाणलोट प्रकल्प आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

हिवरे बाजारच्या पाणलोट क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्बन स्थिरीकरण प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील नेब्रास्का युनिव्हर्सिटी आणि आयआयटी, भुवनेश्‍वर येथील शास्त्रज्ञांनी नुकतीच भेट दिली. गावातील जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि ग्रामविकासाच्या आदर्श कार्यपध्दतीने पाहुणे भारावून गेले.

- Advertisement -

नेब्रास्का वॉटर सेंटर, नेब्रास्का युनिव्हर्सिटी, लिंकनचे संचालक डॉ. चित्तरंजन रे आणि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुवनेश्‍वरचे माजी अधिष्ठाता तसेच एस.ओ.ए. युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर क्लायमेट स्मार्ट ग्रीकल्चरचे संचालक डॉ. रवींद्र कुमार पांडा यांनी हिवरे बाजारात भेट देऊन चालू प्रकल्पाची माहिती घेतली. भेटीदरम्यान मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन कुमार नांदगुडे यांनी कार्बन स्थिरीकरणासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, त्याची कार्यध्दती आणि संभाव्य पर्यावरणीय परिणाम यांचे सविस्तर सादरीकरण केले. पाहुण्यांनी या प्रकल्पाचे कौतुक करत, हवामान बदलाच्या पार्श्‍वभूमीवर हा उपक्रम आदर्श ठरू शकतो असे नमूद केले.

यानंतर पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासोबत विशेष चर्चा झाली. यात नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पाणलोट क्षेत्र विकास आणि ग्रामविकासातील हिवरे बाजारच्या क्रांतिकारक यशाची मांडणी झाली. ओडिशा राज्यात अशाच स्वरूपाचे प्रकल्प सुरू करण्याची तयारी डॉ. रे आणि डॉ. पांडा यांनी व्यक्त केली. पोपटराव पवार यांनी तांत्रिक मार्गदर्शन, शेतकर्‍यांना प्रशिक्षण आणि आवश्यक मदत पुरविण्याचे आश्‍वासन दिले. तसेच देशातील इतर भागांतही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याच संदर्भात त्यांना अमेरिकेतील नेब्रास्का युनिव्हर्सिटीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून सहभागी होण्याचे औपचारिक निमंत्रण पाहुण्यांनी दिले.

या संपूर्ण भेटीचे विद्यापीठ स्तरावरील नियोजन डॉ. संगीत शिंदे, सुनील साळुंखे आणि संतोष कहर यांनी केले. तर हिवरे बाजारातील कार्यक्रमाचे आयोजन व प्रक्षेत्र भेट प्रसन्ना पवार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

ताज्या बातम्या

संपादकीय : १३ जून २०२६ – खांद्यावरील जू उतरले, पण व्यवस्थेचे...

0
लातूर जिल्ह्यातील शेतकरी काशिनाथ गायकवाड व त्यांच्या अर्धांगिनी हौसाबाई यांचे जे चित्र समाज माध्यमे आणि वृत्तपत्रांमध्ये झळकले, ते आधुनिक, प्रगत आणि डिजिटल भारताचा दावा...