पुणे | Pune
राज्यासह देशभरात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून खरात सोबत अनेक बड्या नेत्यांची नावे समोर येत आहे. याप्रकरणी चाकणकरानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केला आहेत.
एक महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरातच्या कार्यलयात जात होत्या. नीलम गोऱ्हे या गेली पाच ते सहा वर्षे खरातकडे जात होत्या असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांनी मंत्रीपदासाठी खरातकडून तंत्रमंत्र पूजा करून घेतली होती. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची देखील अशोक खरात प्रकरणात एसआयटीने चौकशी करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यावर नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषेद बाजू मांडली आहे.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, आज सकाळी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी माझ्यासंदर्भात काही विधाने केली आहेत, त्यासंदर्भात मी तुमच्यासमोर निवेदन वाचत आहे. गेल्या चार दशकांपासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रीय आहे. माझी संपूर्ण कारकिर्द स्वच्छ आणि पारदर्शक राहिलेली आहे. माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत अॅड. श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिका गोऱ्हे आणि माझे वडिल शास्रज्ञ डॉ. दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिबंवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे. त्यामुळे अशोक खरातला कधीही भेटायचा संबंध नाही असं गोऱ्हे म्हणाल्या. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केले होते. त्यावर गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर
माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर, अक्कलकोट स्वामी समर्थ, साईबाबा, गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर दत्त महाराजांवर आहे. महिलांची प्रगती आणि सामाजिक न्याय यावर काम केले. या काळात राजकीय पद किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी मी कधीही भोंदूबाबाच्या दर्शनाला गेले नाही. त्यामुळे नाशिक येथील एका हॉटेलमध्ये खरात नावाच्या व्यक्तीला भेटले ही बातमी स्पष्टपणे नाकारते.”
बुवाबाजीची मला गरज भासली नाही
राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळविण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासली नाही. नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये खरात नावाच्या व्यक्तीला सहा-सात वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटल्याचे वृत्त मी स्पष्टपणे फेटाळत आहे.
जर कुणी गर्दीतून भेटलं असेल तर त्याची माहिती नाही
सगळीकडे सीसीटीव्ही असतात, अनेक ठिकाणी आपल्यासोबत फोटो काढतात. त्यावेळी जर कुणी गर्दीतून भेटले असेल तर त्याची माहिती नाही, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. मी कधीच कुठल्या हयात असलेल्या महाराजाकडे गेले नाही, त्यामुळे अशी घटना घडली असेल त्याची शक्यता नाही, असेही त्या म्हणाल्या.
अधिवेशन संपताच २६ तारखेला आयोजित कार्यक्रमात मी माझी कठोर भूमिका स्पष्ट केली आहे. मी समाजात चांगल्याप्रकारे काम करत असल्यामुळे या खोट्या प्रचाराला उत्तर देणे मला आवश्यक वाटत नव्हते परंतु आजकालच्या परिस्थितीत खोटे बोलून कोलीत कोणाच्या हाती मिळू नये म्हणून मी ही वस्तुस्थिती मांडत आहे.याप्रकारच्या खोट्या प्रसिद्धीशी मुकाबला करायला मी सर्व प्रकारे सज्ज व समर्थ आहे.




