पुणे | प्रतिनिधी Pune
देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट-युजी २०२६’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मुळचा लातूर रहिवासी असलेला पी.व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली असून, तो या पेपरफुटीचा मूळ स्त्रोत असल्याचे तपासात समोर आले आहे.
प्राध्यापकानेच फोडला पेपर
तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी पी.व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा (रसायनशास्त्र) व्याख्याता असून, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या वतीने परीक्षा प्रक्रियेत त्याचा सहभाग होता. या कामामुळे त्याला प्रश्नपत्रिकांची उपलब्धता झाली होती. मूळचा लातूरचा असलेला कुलकर्णी सध्या पुण्यात कार्यरत होता. त्याने या संधीचा गैरफायदा घेत एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना एकत्र केले. यासाठी त्याला पुण्यातील बिबेवाडी परिसरात सुखसागरनगर येथे राहणाऱ्या ब्युटी पार्लर चालक मनिषा वाघमारे या दुसऱ्या आरोपीने मदत केली, तिला सीबीआयने १४ मे रोजीच अटक केली होती.
अशी होती कार्यपद्धती
कुलकर्णीने पुण्यात आपल्या राहत्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी ‘विशेष कोचिंग क्लासेस’ आयोजित केले होते. या वर्गांमध्ये त्याने प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे विद्यार्थ्यांना तोंडी सांगितली. विद्यार्थ्यांनी ही उत्तरे आपल्या वहीत लिखित स्वरूपात लिहून घेतली होती. धक्कादायक बाब म्हणजे, विद्यार्थ्यांनी वहीत लिहिलेले हे प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळले आहेत. या बदल्यात मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळण्यात आल्याचा संशय आहे.
देशभरात मोठी कारवाई
शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीनंतर सीबीआयने १२ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता. गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील पाच आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पुण्यात अटक केलेल्या दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडसाठी पुणे न्यायालयात हजर करून दिल्लीत नेले जाणार आहे.
सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून, या रॅकेटमध्ये आणखी मोठ्या व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.




