Monday, April 6, 2026
HomeनगरCrime News : मुळाकाठ परिसरात खळबळ! जुन्या वादातून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

Crime News : मुळाकाठ परिसरात खळबळ! जुन्या वादातून गोळीबार, तरुण गंभीर जखमी

करजगाव । वार्ताहर

नेवासा तालुक्यातील अंमळनेर येथे जुन्या वादाच्या कारणावरून मध्यरात्री गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात गणेशवाडी येथील एक २० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण मुळाकाठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० फेब्रुवारी २०२६) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास अंमळनेर येथील पाटाच्या कच्च्या रस्त्याजवळ ही घटना घडली. जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि रागाच्या भरात आरोपीने गोळीबार केला. यामध्ये रोहित शिवाजी दरंदले (वय २०, रा. गणेशवाडी) हा तरुण गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

या प्रकरणी कैलास ज्ञानदेव दरंदले (वय ४५, रा. गणेशवाडी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, सिताराम अशोक जाधव (रा. शिरेगाव) आणि प्रकाश बाळू भोसले (रा. निंभारी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी सिताराम जाधव याने आपल्याकडील गावठी कट्ट्यातून रोहितवर गोळी झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

सोनई पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत प्रकाश बाळू भोसले याला ताब्यात घेतले आहे. मात्र, गोळीबार करणारा मुख्य आरोपी सिताराम जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक सूरज मेढे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शांत असलेल्या मुळाकाठ परिसरात अशा प्रकारे गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : सोनेवाडीच्या तरुणाचा कोयनेच्या बॅकवॉटरमध्ये बुडून मृत्यू

0
सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi कष्टाने मिळवलेले यश आणि कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेलेल्या एका तरुणावर काळाने घाला घातला आहे. कोपरगाव...