मुंबई । Mumbai
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काल (शनिवारी) रात्री चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. याचबरोबर या दुर्दैवी घटनेबाबत संतापही व्यक्त होत आहे. अशात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना हा एक कट असल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी हा कट एक कट असून ते राजकीय षडयंत्र असू शकते. त्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे. मुद्दाम प्लॅटफॉर्म बदलणारे रेल्वे अधिकारी कोण? प्लॅटफॉर्म बदलण्याचा निर्णय घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव किंवा प्रभाव तर नव्हता ना? की काय मुद्दाम घेतलेला हा निर्णय आहे? असा सवाल करत संजय निरुपम यांनी या घटनेवर संशय व्यक्त केला आहे.
दरम्यान, काही विरोधी नेते महाकुंभच्या भव्य कार्यक्रमाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमावर विरोधकांकडून कायम प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच रेल्वे स्थानकावर किती गर्दी होत आहे, याचा अंदाज रेल्वे प्रशासनाला असावा. त्यानुसार किती गाड्या चालवायला हव्यात? तिकीट विकले आणि प्रवासी जाऊ शकत नाहीत अशी एकंदरीत परिस्थिती होती. मात्र या घटनेची नैतिक जबाबदारी रेल्वेमंत्र्यांची नसून अधिकाऱ्यांची असल्याचे ही संजय निरुपम म्हणाले.
रविवारची सुट्टी असल्याने लोकांना प्रयागराजला जायचे आहे. अशात ही घटना घडल्याने मी व्यथित आहे. म्हणून मी या घटनेबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे प्रश्न उपस्थित करत आहे. प्रशासनाला ही या घटनेबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. असेही संजय निरुपम म्हणाले.
दरम्यान लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही महाकुंभमेळ्याला प्रयागराजला जाण्यासाठी रेल्वे स्थनकांवर योग्य व्यवस्था केली नसल्याची टीका केली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी.”