Monday, December 2, 2024
HomeनगरBhenda-Kukana Water Supply Scheme : भेंडा-कुकाणा पाणीपुरवठा योजनेची ६६ लाखांची पाणीपट्टी थकली

Bhenda-Kukana Water Supply Scheme : भेंडा-कुकाणा पाणीपुरवठा योजनेची ६६ लाखांची पाणीपट्टी थकली

भेंडा । सुखदेव फुलारी

नेवासा तालुक्यातील भेंडा कुकाणा व इतर ६ गावांच्या पाणी साठवण तलावात १० ते १५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असून अशा परिस्थितित ६ ग्रामपंचायतीकडे ६६ लाख ८५ हजार २१२ रूपयांची नळ पाणीपट्टी थकली असून सदर पाणीपट्टी तातडीने न भरल्यास भेंडा-कुकाणासह ६ गावांचा नळ पाणी पुरवठा कधीही खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे १९९१ च्या जनगणनेनुसार २०,३३४ व्यक्ती तर २०३० ची प्रकल्पित लोकसंख्या ४४,००० व्यक्ती गृहित धरून दरदिवशी प्रतिमाणूस ५५ लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल या क्षमतेची भेंडा कुकाणा व इतर चार गावांची ही नळ पाणी योजना आहे.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच्या उद्भव धरून ही योजना उभी राहिलेली आहे. सहा गावांना दोन महिने पुरेल इतके पाणी साठवण्यासाठी २६० दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंट काँक्रिटचा पाणी साठवण तलावाची व्यवस्था असून शुद्धीकरण प्रकल्प आहे. ही योजना कार्यान्वयीत झाल्यापासून भेंडा येथील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, कुकाणा, तरवडी, चिलेखनवाडी व अंतरवाली या ६ गावांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.

मात्र भेंडा कुकाणा व इतर चार गावांच्या ग्रामपंचायतींकडे नळ पाणीपुरवठा योजनेची ६६ लाख रुपये थकबाकी झाली आहे. त्यातच पाणी योजनेकडील वीज बिल थकबाकी ही वाढलेली असून ४७ लाख रुपये वीज बिल थकित आहे तर मुळा पाटबंधारे विभागाची ११ लाख ६८ हजार ८६० रुपये पाणी पट्टी थकित आहे.

वीज बिल व पाणी पट्टी थकबाकी वाढल्याने कोणत्याहीक्षणी वीज व पाणीपुरवठा बंद होऊन पाणी योजना बंद पडू शकते. संत ज्ञानेश्वर पाणी व्यवस्थापन समितीमध्ये पाणीपुरवठा होत असलेल्या ६ गावांचे सरपंच व ग्रामसेवक सदस्य आहेत. तरीही ग्रामपंचायत थकबाकी वाढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ राजकीय स्वार्थापोटी पाणीपट्टी वसुली केली जात नसल्याचे चित्र ६ ही गावात दिसून येत आहे.

दैनंदिन नळ पाणीपुरवठ्यासाठी लागणारे गावनिहाय पाणी..

भेंडा बुद्रुक (१५ लाख लिटर), भेंडा खुर्द (२ लाख लिटर), कुकाणा (१५ लाख लिटर), चिलेखनवाडी (१.२५ लाख लिटर), अंतरवली (१.५ लाख लिटर), तरवडी (२.५ लाख लिटर).

३० नोव्हेंबर अखेर गावनिहाय पाणीपट्टी थकबाकी

१) भेंडा बुद्रुक २४ लाख ३ हजार
२) भेंडा खुर्द १ लाख ९७ हजार
३) कुकाणा २६ लाख ७० हजार
४) अंतरवाली ३ लाख ३ हजार
५) चिलेखनवाडी- ३ लाख २४ हजार
६) तरवडी ७ लाख ८६ हजार
एकूण ६६ लाख ८५ हजार रुपये

अनधिकृत नळजोडण्या तोडण्याची मागणी

भेंडा ते चिलेखनवाड़ी दरम्यान असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वितरीकेवर (पाईप लाईनवर) अनेक व्यावसायीकांनी अनधिकृत नळ जोडणी केलेली आहे. सदर अनधिकृत नळ जोडण्या तोड़ण्याची मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.

पाटबंधारे विभागाची नोटीस

संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समितीकडे असलेली ११ लाख ६८ हजार ८६० रुपये थकित पाणीपट्टी ही नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांत भरण्याची कार्यवाही करावी अन्यथा करारनाम्यातील अटी व शर्ती मधील अट क्रमांक, ९ नुसार आपण वेळेवर पाणीपट्टी न भरल्यामुळे आपला पाणीपुरवठा खंडित करण्यांत येईल व त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस केवळ आपण जबाबदार राहाल, याची नोंद घ्यावी अशी नोटीस मुळा पाटबंधारे विभागाने बजावली आहे.

भेंडा-कुकाणा व इतर ६ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेची थकबाकी ६६ लाख रुपये झाली आहे. योजनेच्या तलावात थोडेच पाणी शिल्लक आहे. दर महिन्याला ५९ हजार रुपये कर्मचारी पगार, १५ हजार रुपये क्लोरिनचा खर्च येतो. त्यामुळे थकबाक़ी त्वरित न भरल्यास संबंधित गावांचा पाणी पुरवठा कधीही बंद होऊ शकतो. त्यामुळे लाभधारक ग्रामपंचायतींनी थकबाकी भरून सहकार्य करावे.

– वैशाली शिवाजी शिंदे, अध्यक्षा, संत ज्ञानेश्वर संयुक्त पाणी व्यवस्थापन समिती

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या