Saturday, April 25, 2026
HomeनगरNewasa : नेवासाचे पीआय महेश पाटील यांची उचलबांगडी; ढिकले यांच्याकडे पदभार

Newasa : नेवासाचे पीआय महेश पाटील यांची उचलबांगडी; ढिकले यांच्याकडे पदभार

गोळीबार प्रकरण व पुतळा विटंबना प्रकरणी कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. येथील सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे नेवासा पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

- Advertisement -

नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी उपनगराध्यक्ष शालिनी सुखदान यांचे पती संजय सुखदान याच्याकडून त्रास होत असल्याची तक्रार निरीक्षक पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. दरम्यान, 13 एप्रिल रोजी सायंकाळी पंचायत कार्यालयातील बैठकीदरम्यान संजय सुखदान याने फराटे यांना दमदाटी केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर फराटे हे अहिल्यानगरकडे निघाले असता, सुखदान याने दुचाकीवरून पाठलाग करत खोलेश्वर चौकाजवळ त्यांचे वाहन अडवले.

यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप आहे. या घटनेनंतरही नेवासा पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल झाला नसल्याचे समोर आले आहे. अखेर सहा दिवसांनंतर फराटे यांनी अहिल्यानगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तेथे गुन्हा दाखल करून प्रकरण नेवासा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होतच संजय सुखदान याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले असतानाही निरीक्षक पाटील यांनी अटक करण्यास टाळाटाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

याशिवाय, नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे 20 एप्रिल रोजी महापुरूषांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, हे प्रकरण हाताळताना देखील निरीक्षक पाटील यांनी हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक पाटील यांच्यावर कामात दुर्लक्ष केल्याचे आरोप प्राथमिक चौकशीत सिध्द झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. सध्या नेवासा पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची विधाने; CM...

0
नाशिक | Nashik नागपूरमध्ये (Nagpur) डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या 'भारतदुर्गा' मंदिराचा शिलान्यास सोहळा काल (शुक्रवारी) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत...