Friday, September 11, 2026
HomeनगरAhilyanagar : नेवासा तालुक्यात दहशत करणारी टोळी हद्दपार

Ahilyanagar : नेवासा तालुक्यात दहशत करणारी टोळी हद्दपार

जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांचे आदेश, तिघा सराईत गुन्हेगारांचा समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नेवासा तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून दहशत निर्माण करणार्‍या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर अखेर पोलिसांनी निर्णायक कारवाई करत टोळी प्रमुखासह तिघांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

- Advertisement -

टोळी प्रमुख शुभम विश्वास उर्फ विश्वनाथ गर्जे (वय 29, रा. वडुले, ता. नेवासा), टोळी सदस्य आकाश उर्फ दत्तु उर्फ दत्ता उर्फ दत्तात्रय मच्छिंद्र सावंत (वय 25) आणि योगेश मच्छिंद्र सावंत (वय 28, दोघे रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. शुभम गर्जे याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून नेवासा तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. सन 2020 ते 2025 या कालावधीत या टोळीने गंभीर दुखापत करणे, दरोडे टाकणे, अश्लिल कृत्ये करून दमदाटी करणे, अग्नीशस्त्रांच्या सहाय्याने खुनाचा प्रयत्न करणे, गुंगीकारक पदार्थांची विक्री करणे अशा एकूण नऊ गंभीर गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग आढळून आला. त्यांच्या सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले होते.

परिणामी, कोणीही उघडपणे तक्रार किंवा साक्ष देण्यासाठी पुढे येत नव्हते. या टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झाला नव्हता. भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेता, नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 55 अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी या प्रस्तावाची सखोल चौकशी करून शिफारस केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक घार्गे यांनी तिन्ही गुन्हेगारांना अहिल्यानगर जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले.

जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शरीराविरूध्द, मालमत्तेविरूध्द, गोवंशीय कायद्यान्वये, शस्त्र कायदा तसेच वाळू चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली जात आहे. तसेच, आणखी संशयित टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, त्यांच्यावरही लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...