अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ प्रकरणावरुन आमदार राम शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला काल राम शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. मला वाटतं आमदार रोहित पवारांनी जे आरोप केलेत ते बिनबुडाचे, आधारहीन, खोटे आरोप आहेत.
ज्यावेळेस त्यांनी पासपोर्ट दिल्याचा आरोप केला, तेव्हा त्यांनी माजी मंत्री तानाजी सावंत, चंद्रकांतदादा पाटील यांचा उल्लेख केला,पासपोर्ट देण्यासाठी सपोर्ट केला म्हणून. मूळात निलेश घायवळला पासपोर्ट 2020 साली मिळाला. निलेश घायवळ यांच्या नातेवाईकांनी सांगितलय की, हा पासपोर्ट मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामार्फत प्रयत्न केले. दुसर्यांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी या आरोपांच उत्तर दिलं पाहिजे असं राम शिंदे म्हणाले.
आम्ही मदत केली नाही. पण चर्चेत, हायलाईटमध्ये राहण्यासाठी तुम्ही अशी नावं घेता, आता ते तोंडघाशी पडले आहेत. पासपोर्ट देण्याच्या विषयात रोहित पवार खोटं बोलले आहेत असं राम शिंदे म्हणाले.सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यात रोहित पवारांनी थेट तुमचं नाव घेतलं, तुम्ही सांगितलं म्हणून दिलं, या प्रश्नावर राम शिंदे यांनी उत्तर दिलं. मला असं वाटतं की, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना काही अधिकार आहेत. कोणाला परवाना द्यायचा, नाही हा विषय त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतो. ते स्वतंत्रपणे चांगलं काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी लायसन्स देण्याचा प्रश्नच नाही. कोणी मदत केली नाही. रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं राम शिंदे म्हणाले.
त्यांच्यात कशावरुन बिनसलं ?
मी मंत्री होतो, मला पाडायचं होतं, तेव्हा ते पहिल्यांदा निलेश घायवळला जामखेडला घेऊन आले. त्यांच्या बैठका झाल्या, त्यांचे कैटुंबिक संबंध आहेत. त्यांच्यात कशावरुन बिनसलं, देण्या-घेण्यावरुन की रिअल इस्टेटवरुन त्यांनाच माहित. आमच्या भागात अनेक फोटो छापून आलेले, बातम्या आलेल्या. निलेश, सचिन घायवळ होते, म्हणून ग्रामपंचायती निवडून आल्या, असं रोहित पवार बोलल्याच्या बातम्या पेपरमध्ये आल्या असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला.
हाणूनमारुन आमचे सदस्य पळवले
त्यानंतर आमच्या पंचायत समितीच्या सदस्यांना कसं मारुन मुटकून हाणूनमारून कसं सभापती केलं हे तालुक्याला माहित आहे. त्यावेळी मी सुद्धा आरोप केलेले. हाणूनमारुन आमचे सदस्य पळवले. हे सर्व रोहित पवारने केलं. निलेश घायवळ त्यांच्या बरोबर गेला की सामाजिक कार्य आणि आमच्या प्रचारात आला की गुंड. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा माणूस हा गुंडच असतो असं राम शिंदे म्हणाले.
मोक्का मधून सोडवण्यासाठी कोणी मदत केली ?
निलेश घायवळ सोबत संबंध असल्यावरुन आरोप होत आहेत, त्यावर राम शिंदे म्हणाले की, निलेश घायवळ आणि माझ्यात दूरदूरपर्यंत संबंध नाही. मी गृहराज्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्याच्यावर मोक्का लावला. त्यातून सोडवण्यासाठी रोहित पवारांनी मदत केली.
रोहित पवारांनी राम शिंदेंचा दावा खोडून काढला
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मा. प्रा. राम शिंदे सर, पासपोर्ट राज्य सरकार नाही तर केंद्र सरकार देत असतं, एवढी साधी गोष्ट आपणास कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल. घायवळ देशाबाहेर आहे, आपणही मागील काही दिवस देशाबाहेर होतात म्हणून कदाचित अहिल्यानगर एसपी साहेबांनी दिलेलं स्पष्टीकरण आपण पाहिलं नसावं, ते आपण नक्की बघा. पासपोर्ट 2020 साली मिळाला तेंव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं याचा विसर पडला का?
ज्यांना आपण राजरोसपणे विधीमंडळात घेऊन फिरलात, निवडणुकीत स्वतःच्या प्रचारासाठी ज्यांना संपूर्ण मतदारसंघात फिरवलंत, जे जाहीरपणे आपले चरणस्पर्श करतात, ज्यांची जाहिरपणे ओळख आपण इतर आमदारांना करून देतात त्यांच्याशी दूरदूरपर्यंतचा संबंध नाही असं कसं? मग दूरदूरपर्यंतचा संबंध नाही तर खूप जवळचा संबंध आहे, असं तर म्हणायचं नाही ना आपल्याला ? आता प्रकरण अंगलट आल्याने गोल गोल फिरवण्यापेक्षा घायवळने तुमचा प्रचार केला की नाही? तुमच्या बहुतांश सभांमध्ये घायवळने भाषणं केली की नाही? मुख्यमंत्र्याच्या स्टेजवर तुम्ही घायवळला बसवलं की नाही? ते सांगा. मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे पासपोर्ट कुणी दिला, बंदूक परवान्यासाठी कुणी शिफारस केली या सगळ्याची तत्काळ चौकशी करून सत्य समोर आणा.





