निफाड | वार्ताहर Niphad
निफाड साखर कारखाना विक्री करण्याचा डाव जिल्हा बँकेने आखला आहे. पण जोपर्यंत कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये देणे आणि सभासदांच्या ठेवी मिळत नाही, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही, निफाड कारखाना शेतकर्याच्या सभासदाच्या आणि कामगारांच्या कष्टाच्या घामातून उभा राहिलेला आहे, त्याला असा गिळंकृत होऊ देणार नाही, अन्यथा आम्ही सर्व कामगार आत्महत्या करू व गेटवरच फाशी घेऊ, असा संतप्त निर्वाणीचा इशारा निफाड साखर कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी झालेल्या बैठकीत उपस्थित कामगार , सभासदांनी दिला.
यावेळी निफाड कारखान्याच्या कामगार व सभासदांनी निसाकाच्या गेटवर प्रचंड घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. भाऊसाहेबनगर येथील निफाड साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निसाका कामगार, सभासद आणि शेतकर्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
गेल्या काही दिवसांपासून निसाकाबाबत वेगवेगळ्या चर्चा निफाड तालुयात सुरू असल्याकारणाने निफाड साखर कारखाना कामगार आणि सभासदांमध्ये संभ्रम पसरला असून जिल्हा बँक सदरील कारखाना विक्री करणार असल्याची चर्चा कामगार आणि सभासदांमध्ये असल्याने निफाड तालुयात एकच संतापाची लाट उसळली आहे. त्या अनुषंगाने या विषयावर आयोजित बैठकित कामगारांना मार्गदर्शन करताना सरचिटणीस बी.जी.पाटील म्हणाले की, जोपर्यंत निफाड साखर कारखाना कामगारांचे ८१ कोटी ९४ लाख रुपये कामगारांना व सभासदांना ठेवी मिळत नाही, तोपर्यंत हा कारखाना विक्री करू दिला जाणार नाही अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू किंवा गेटवर फाशी घेऊ असा संतप्त इशारा दिला.
कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, करंजगावचे माजी सरपंच व सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, लहू मोरे, नानासाहेब दाते, गोकुळ झाल्टे,अमित ताजने, सोमनाथ झाल्टे यांनी हा कारखाना जिल्हा बँकेला विक्री करू दिला जाणार नाही, कारखाना सुरू करण्यासाठी व कारखाना वाचवण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी मतभेद विसरून निसाका वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. माजी आमदार अनिल कदम यांनीही यावेळी बैठकीत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत आपण सभासद व कामगारांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याची ग्वाही दिली.
बैठकीला माजी सरपंच तानाजी पुरकर, सभासद प्रतिनिधी खंडू बोडके पाटील, बाळासाहेब बागस्कर, सुभाष जोमन, विजय रसाळ, विष्णुपंत मत्सगार, पुंडलिक ताजने, शिवाजी मोरे, नितीन निकम, सचिन आढाव, किरण वाघ, केशव झाल्टे, पंढरीनाथ उगले, उत्तम गायकवाड, नानासाहेब बोरस्ते, सिताराम मोरे, विजय रसाळ आदींसह पिंपळस कसबे सुकेने मौजे सुकेने वडाळी शिरसगाव, चांदोरी, सायखेडा, करंजगाव व गोदाकाठच्या विविध गावांमधून सभासद शेतकरी आणि कामगार उपस्थित होते.
निफाड साखर कारखाना हा सभासद यांच्या मालकीचा असून भाडेपट्टा कराराची पुनर्रचना करावी. सत्तेचा दुरुपयोग करून निफाड कारखाना गिळंकृत करण्याचा काही महाभागांचा डाव आहे. सभासद व कामगारांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल.
खंडू बोडके,सभासद शेतकरी
निफाड कारखान्याच्या मालमत्ता विक्रीला आमचा ठाम विरोध आहे. कामगारांचे ८१ कोटी रुपये देणी असताना जिल्हा बँकेने विक्रीचा घाट घातला आहे. हा कारखाना कधीही विक्री करू दिला जाणार नाही .
प्रमोद गडाख, कार्याध्यक्ष कामगार संघटना




