Friday, September 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनिसाकाची परवड : भाग ५ - भंगार विक्रीतच कंपनी मालामाल

निसाकाची परवड : भाग ५ – भंगार विक्रीतच कंपनी मालामाल

कारखाना चालविण्यातील स्वारस्य संपले

- Advertisement -

नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै.’देशदूत’ सल्लागार संपादक

निफाड सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देतांना जिल्हा बँकेच्या काही अधिकार्‍यांनी बँकेच्या हिताला बाधा येईल असे वर्तन केल्याचे करारातील तरतुदींवरुनच दिसते आहे. कडलग कंपनीला फायदा होईल असा करारातील मुददा क्र. ६१ आहे. सव्वा पाच कोटींचे मूल्यांकन असलेले साहित्य अवघ्या दोन कोटींना कंपनीला विक्री केल्याचे दाखविले. याच व्यवहारात म्हणजेच भंगार विक्रीत कंपनीने घबाडयोग साधल्याची चर्चा आहे.

निफाड कारखाना भाडेपट्टयाने देण्याच्या करारात व नंतर झालेल्या घटनांच्या जेवढ्या खोलात शिराल तेवढ्या भानगडी बाहेर पडत आहेत. करार करतांना शासनाचे व साखर आयुक्तांचे नियम डावलण्यात आले. बँकेच्या अधिकार्‍यांनी त्यात विशेष रस घेतल्याचेही निष्पन्न होत आहे. कारखान्याच्या आवारात असलेले विविध साहित्य दोन कोटी रुपयांची किंमत ठरवून कंपनीला विक्री केल्याचे करारातील मुददा क्र. ६१ मध्ये दर्शविले आहे. कारखान्याचे जनरल स्टोअर्समधील साहित्य, टायरच्या बैलगाड्या, वाहने आदींचे मूल्यांकन बँकेने आपल्या स्तरावर करुन कडलग कंपनीला दोन कोटी रुपयांना विक्री केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात कारखान्याच्या अहवालातील शासकीय लेखापरीक्षकाचा अहवाल व ताळेबंदातील नोंदीनुसार स्टोअर किंमत तीन कोटी तीस लाखांच्या आसपास होती.

टायरगाड्या ८९ लाख तर इतर वाहने एक कोटी असे मिळून पाच कोटी अठरा लाखांवर रक्कम होते. आता यातच तीन कोटींचा गाळा टाकला. त्यातील वाटे कोणाकोणाला गेले हे बाहेर यायला हवे. सर्वसाधारणपणे लेखापरीक्षकही घसारा गृहित धरुन मूल्यांकनाची किंमत निश्चित करतात. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक किंमत त्यांना बाजारात मिळू शकते. याची माहिती असल्यानेच हा उद्योग केला असावा. यात बैलगाड्या ९९४, सहा ट्रॅक्टर, एक रुग्णवाहिका, एक पिकअप व्हॅन, टाटा टर्बो ट्रक, टाटा ४०७ टेम्पो, दोन टाट डंपर, एक बुलडोझर, कंपोज्ड मशीन, एक ट्रेलर, एक टँकर आणि दोन मोटारसायकली अशा वाहनांचा समावेश होता. यातील काही वाहने अत्यंत जुनी असल्याने त्यांचे मूल्य घसरले असतील हे समजू शकते. मात्र, लोखंडाचा बाजारभाव गृहित धरला तरी केवळ भंगाराचीच किंमत कितीतरी अधिक होते.

समजा हे मूल्यांकन ठीकठाक होते असे गृहित धरले तरी स्टोअर व इतर साहित्य हे संबधीत कंपनीस देण्याबाबत शासन नियम डावलले गेले आहेत. याचे कारण म्हणजे, नजीकच्याच रानवड सहकारी साखर कारखाना जेव्हा भाडेतत्वावर दिला गेला तेव्हा स्टोअर्स, इतर साहित्य तसेच भंगार सामान हे संबधीत कंपनीस विक्री केली गेली नाही. याचाच अर्थ या कामातही कडलग कंपनीवर मेहेरबानी केल्याचे स्पष्ट दिसते. भंगार विकूनच मालामाल झाल्याने आता कंपनीला कारखाना सुरु करण्यात काहीही स्वारस्य उरलेले नसल्याचे दिसते.
(क्रमश:)

ताज्या बातम्या

दै.’देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन सोहळा

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्‍या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि....