नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै.’देशदूत’ – सल्लागार संपादक
प्रदीर्घ काळानंतर निफाड सहकारी साखर कारखाना पुन्हा चर्चेत आला असून यावेळी मात्र त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आहे. जेएनपीटीला शंभर एकर जागा दिल्यानंतरही कर्ज न फिटल्याचे कारण देत जिल्हा सहकारी बँकेने कारखान्याची उर्वरित जागाही विक्रीला काढण्याची हालचाल सुरू केली असून सभासद शेतकर्यांसह कामगार या विरोधात एकवटले आहेत.
जिल्ह्यातील आजारी असलेल्या व बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या उर्जितास्थेसाठी सध्या अनेक पुढार्यांचे जोरदार प्रयत्न सुरू असून शेतकर्यांच्या हिताच्या आडून भलताच स्वार्थ साधण्याचा तर काहींचा प्रयत्न नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. सध्या निफाड व रानवड हे कारखाने अनुक्रमे बी. टी. कडलग कन्स्ट्रशन कंपनी व स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था या संस्थांनी चालवण्यास घेतले आहेत. आता या संस्थांना साखर कारखाना चालवण्याचा अनुभव काय, असा प्रश्न सामान्यांना पडू शकतो. परंतु, जिल्हा बँक अथवा सरकारी बाबूंना तो पडत नाही. कारण सत्तेतील बड्या मंडळींचा आशीर्वाद असल्याने कायद्यालाही मुरड घालून त्यांना हे कारखाने तब्बल पंचवीस वर्षांच्या कराराने चालवण्यास दिले गेले.
निफाड कारखाना तर गेल्या चार वर्षात सुरूही झालेला नाही. रानवडने मात्र तीन वर्षे गाळप केले. चौथ्या वर्षी त्यानेही मान टाकली. आता या दोन्ही नव्या मालकांनी, तुमचं तुम्ही बघा आणि आम्हाला मोकळं करा, असा हट्ट जिल्हा बँक व इतर वित्तीय संस्थांकडे धरला आहे. याचाच भाग म्हणून निफाडच्या जागेच्या विक्रीचा मुद्दा पुढे आला आहे तर रानवड कारखान्याची फेरनिविदा काढली गेली आहे. कोपरगावच्या संजीवनी उद्योग समूहाने रानवडला दत्तक घेण्याविषयी स्वारस्य दाखविल्याची चर्चा आहे.
निफाड कारखाना जरी बी. टी. कडलग कन्स्ट्रशन कंपनीला चालवायला दिला असला तरी प्रत्यक्षात त्यांनी नंतर अष्टलक्ष्मी शुगर अँड इथेनॉल कंपनीकडे सुपूर्द केल्याचे कागदोपत्री दिसते. या कंपनीचे संचालक म्हणून दस्तुरखुद्द बी. टी. कडलग, माजी खासदार हेमंत गोडसे आणि लक्ष्मण कदम यांची नावे आहेत. कारखान्याच्या कार्यस्थळी अष्टलक्ष्मीचेच नाव आहे. तीन वर्षात कारखान्यात भंगार मालाच्या विक्रीव्यतिरिक्त काही घडलेले दिसत नाही. अद्याप एकही हंगाम सुरू केला नाही. ते शयही नाही; कारण तीनपैकी एका बॉयलरची साधनसामग्री साईटवर येऊन पडलेली दिसते आहे.
एकीकडे ही स्थिती, तर दुसरीकडे आता जिल्हा बँकेने शंभर एकर जागा विक्रीला काढण्याचे ठरवले आहे. कडलग कंपनीशी पंचवीस वर्षांचा करार झाला असताना ती जमीन विक्रीला काढली जाणार असेल तर मग करारभंग झाला का असा प्रश्न पडतो. जशी करार करताना गोपनीयता पाळली गेली तसेच आता होत असल्याने कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली असून सभासद शेतकर्यांमध्ये असंतोष पसरला आहे. बँक याबाबत काहीच भाष्य करीत नसल्याने पारदर्शकतेबाबत शंका उत्पन्न होणे स्वाभाविक आहे.
(क्रमश:)




