मुंबई । Mumbai
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून, निवडणूक आयोग यासाठी तयारी करत आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी “जोपर्यंत मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा,” असे थेट आव्हान निवडणूक आयोगाला दिले आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर आता भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत बोचरी टीका केली आहे.
राज ठाकरे यांच्या मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील मेळाव्यानंतर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. राणे म्हणाले की, राज ठाकरे हे अभ्यासू नेते आहेत आणि ते मुद्देसूद बोलतात, पण त्यांच्याकडून चुकीची माहिती दिली जात आहे. निवडणूक आयोगावर ‘वोट चोरीचे’ आरोप लोकसभा निवडणुकांनंतर का झाले नाहीत, असा सवाल राणे यांनी केला.
तसेच, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत, असा थेट टोलाही त्यांनी लगावला. राणे यांच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरे हे महाविकास आघाडीच्या नादी लागून भाजपला टार्गेट करत आहेत. बोगस मतदारांच्या आरोपावरून राणे यांनी राज ठाकरे यांना ‘वर्मी घाव’ लागेल असा सल्ला दिला. ते म्हणाले, “आता तुम्हाला हिंदू मतदार यादी तपासायची आहे. तुम्ही मालेगाव, बहरमपाडा आणि नळ बाजारमध्ये कधी जाणार?” असा सवाल त्यांनी केला. राज साहेबांनी उद्धव ठाकरेंच्या नादी लागू नये, कारण ते ‘वाया गेलेले मतदार’ आहेत, अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली.
राणेंनी या वेळी धार्मिक आणि सामाजिक विषयांवरूनही राज ठाकरेंवर निशाणा साधला. “नमाज पढण्यासाठी यांना मशिदी कमी पडत आहेत. मोर्चे मोहल्यावर काढा आधी,” असे ते म्हणाले. तसेच, मानखुर्द शिवाजीनगरमधून बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना बाहेर काढण्याचे काम आमच्या (भाजप) सरकारने केले आहे. जर खरोखरच बोगस मतदार जाणून घ्यायचे असतील, तर सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासा, असा सल्ला राणे यांनी राज ठाकरेंना दिला. राणेंनी राज ठाकरेंना टोकदार प्रश्न विचारला, “उद्या हाजीअलीला जाऊन आमच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का? वातावरण कोण खराब करतयं?”
दरम्यान, राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या मेळाव्यात मतदार यादीतील गोंधळावर गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “माझ्या महाराष्ट्रातील सर्व मतदारांना माझी विनंती आहे की सतर्क राहा. एकएका घरांमध्ये आठशे-आठशे लोक भरले जात आहेत, सातशे माणसं, एक हजार माणसं… जे मतदार नाहीत, पण अशी सर्व खोटी मतदार भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणत आहेत.”
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्व यादी प्रमुखांनी घराघरात जावे आणि नागरिकांनी सहकार्य करून याद्या तपासाव्यात. जोपर्यंत ही निवडणूक यादी स्वच्छ होत नाही आणि सर्व राजकीय पक्षांचे समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी निवडणूक आयोगाला दिले.
राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सूरात सूर मिळवून भाजपवर टीका केल्याने राणे यांनी हा पलटवार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘बोगस मतदार’ आणि ‘निवडणूक न घेण्याचे’ आव्हान या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.




