Wednesday, April 15, 2026
HomeराजकीयNitin Gadkari : "सत्तेचा माज दाखवू नका, खुर्चीवर बसलेला प्रत्येकजण…"; नितीन गडकरी...

Nitin Gadkari : “सत्तेचा माज दाखवू नका, खुर्चीवर बसलेला प्रत्येकजण…”; नितीन गडकरी यांची तुफान फटकेबाजी

नागपूर । Nagpur

भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे कान टोचले. राजकारणातील घराणेशाही, सत्तेचा अहंकार आणि केवळ निवडणुकीपुरता विचार करणाऱ्या प्रवृत्तीवर त्यांनी जोरदार प्रहार केला. “सत्ता मिळाली म्हणून माज दाखवू नका, कारण जो खुर्चीवर बसला आहे तो कधी ना कधी उठणारच आहे; आणि जर तो स्वतःहून उठला नाही, तर देव त्याला उचलून नेईल,” अशा शब्दांत गडकरींनी सत्तेच्या अमरत्वाचा भ्रम बाळगणाऱ्यांना इशारा दिला.

- Advertisement -

गडकरी यांनी यावेळी नेतृत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना घराणेशाहीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, काळानुसार पिढी बदलते आणि त्यासोबतच नेतृत्वही बदलते, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, “नेतृत्वाच्या पोटातून नवे नेतृत्व” जन्माला येता कामा नये, तर पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमधून खंबीर नेतृत्व पुढे यायला हवे. कार्यकर्त्यांच्या अफाट कष्टावरच भाजपने आजवरची प्रगती केली असून, कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा कणा आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली.

पक्षातील संधीसाधू राजकारणावर टीका करताना गडकरी म्हणाले की, काही लोकांना दिवसरात्र फक्त निवडणुकाच दिसतात. “माझं काय होणार? मला संधी कधी मिळणार?” याच विचारात अनेकजण मग्न असतात. मात्र, आपण केवळ निवडणुका जिंकायला किंवा कोणाला संधी द्यायला आलेलो नसून, समाज बदलण्याच्या ध्येयाने राजकारणात आहोत, हे कार्यकर्त्यांनी विसरू नये. “तेरा क्या होगा कालिया?” असा टोला लगावत त्यांनी स्वार्थासाठी राजकारणात येणाऱ्यांचा समाचार घेतला.

भाजपच्या विचारधारेवर बोलताना गडकरींनी स्पष्ट केले की, आमचा पक्ष केवळ स्वतःचा किंवा स्वतःच्या जातीचा विचार करत नाही, तर ‘विश्वाचे कल्याण’ हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देत सांगितले की, महाराजांच्या इतिहासात कधीही मशीद तोडल्याचे ऐकिवात नाही. त्यांनी सर्व धर्मांचा आणि महिलांचा आदर केला. हाच वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे. गुन्हेगारीमुक्त समाजासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही त्यांनी ठामपणे मांडले.

आपल्या भाषणात गडकरींनी इराणमधील ‘चाहबार’ बंदराच्या निर्मितीवेळचे अनुभवही सांगितले. त्यांनी सांगितले की, इराणचे नेते आयातुल्ला खोमेनी यांनी त्यांना पर्शियन भाषेचे मूळ संस्कृतमध्ये असल्याचे सांगितले होते. आपली संस्कृती आणि इतिहास एकमेकांशी जोडलेले आहेत. तसेच, हिंदू धर्मातील जुन्या काळातील काही कर्मठ विचारांमुळे धर्माचे नुकसान झाले, अशी कबुलीही त्यांनी दिली. समाज प्रगत करताना जुन्या चुका सुधारून व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : गुन्ह्यातील संशयिताच्या आवळल्या मुसक्या; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik उपनगर पोलीस ठाण्याच्या (Upnagar Police Station) हद्दीत गोळीबार प्रकरणात (Firing Case) नऊ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला गुंडाविरोधी पथकाने जेलरोड परिसरात...