नागपूर | Nagpur
देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील वाढत्या दरीबद्दल केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. हळूहळू देशात गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती चालली आहे, अशी चिंता नितीन गडकरी व्यक्त केली. अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण होता कामा नये. संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे, अशी भूमिका नितीन गडकरी यांनी मांडली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी जिथे त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासात शेती, उत्पादन, कर आकारणी आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. गडकरी म्हणाले की, “हळूहळू गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. असे होऊ नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचा विकास होईल.”
नेमकं काय म्हणाले गडकरी?
गडकरी यांनी सांगितले की, “आम्ही अशा आर्थिक पर्यायाचा विचार करत आहोत जो रोजगार निर्माण करेल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देईल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल झाले आहेत.” गडकरी यांनी उदारमतवादी आर्थिक धोरणे स्वीकारल्याबद्दल माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनाही श्रेय दिले, परंतु त्यांनी अनियंत्रित केंद्रीकरणाविरुद्ध इशाराही दिला. ते म्हणाले, “आपण याबद्दल काळजी केली पाहिजे.” भारताच्या आर्थिक रचनेचा संदर्भ देत, त्यांनी सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) प्रादेशिक योगदानातील असमतोलाकडेही लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘उत्पादन क्षेत्र 22-24 टक्के, सेवा क्षेत्र 52-54 टक्के, तर ग्रामीण लोकसंख्येच्या 65-70टक्के सहभाग असूनही, शेती केवळ 12 टक्के योगदान देते.’
कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, “आता लोक हा प्रश्न विचारत आहे की, आपल्या विकासासाठी आर्थिक चिंतनाची गरज आहे. अमेरिकेने उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले. पण, ते मॉडेलही अयशस्वी ठरले आहे. आपल्या देशातही ही चर्चा आहे की, आपण काय करायला हवे?” “आपले उद्दिष्ट हे आहे की, गरिबांची गरिबी दूर करणारा, तरुणांना रोजगार निर्मिती करणारा, देशाची संपत्ती वाढवणारा आर्थिक पर्याय आपल्याला हवा आहे.
देशात गरीब वाढत चालले आहे
पुढे बोलताना गडकरी म्हणाले, “हळूहळू गरीब वाढत चालले आहेत आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होत चालले आहे. हे होता कामा नये. सत्तेचे विकेंद्रीकरण व्हायला हवे, संपत्तीचेही विकेंद्रीकरण व्हायला हवे. आर्थिक स्थितीमध्ये खूप मोठे बदल झाले आहेत, त्यात सीएची भूमिका खूप महत्त्वाची आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




