मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रकृती अस्वाथ्यामुळे , गुरुवारी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदान करणार नाहीत. प्रकृती बिघडल्याने आपण मतदानाला उपस्थित राहू शकणार नाही, अशी खंत पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली. प्रकृती ठीक नसल्याने पवारांना येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी मंगळवारी एक्स या समाज माध्यमात भावनिक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके आणि लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम आणि विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार आणि कार्यकर्ते मला समजून घेतील याची मी खात्री बाळगतो, असे पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
आमच्या पक्षाने (शरद पवार गट) या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी. मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणूक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला आणि विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित आणि जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागल्याचे पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने ते बारामतीत सांगता सभेला उपस्थित राहिले नाहीत. तिथे त्यांच्या काही चाचण्या सुरू आहेत. त्या झाल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीविषयीची स्पष्टता येईल
सुप्रिया सुळे – राष्ट्रीय कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी शरद पवार गट




