Monday, July 6, 2026
HomeनगरAhilyanagar : जुने कर्ज फिटेना अन् नवे कर्जही मिळेना

Ahilyanagar : जुने कर्ज फिटेना अन् नवे कर्जही मिळेना

बळीराजा अडचणीत, जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात कर्जमाफीचा लाभ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जून महिना संपत आला तरी अद्याप जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे खरीप हंगामासाठी बियाणे व खते (कृषी निविष्ठा) खरेदी करायला शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून केवळ घोषणा ठरलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, तो आता पावसासोबतच कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला आहे. प्रशासनाने ही प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आर्थिक वर्ष 2026-27 साठी सर्व क्षेत्रांत कर्ज वाटपाचा मोठा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला असला, तरी थकीत कर्जदार शेतकर्‍यांसमोर नवीन कर्जाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. सध्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असून खरीप हंगामासाठी कृषी निविष्ठा घेण्यासाठी शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. दुसरीकडे आधीचे कर्ज थकल्याने बँका पैशासाठी दारात उभे करत नसल्याने बळीराजाचा पिक कर्जाचा मार्ग बंद झाला आहे. नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकर्‍यांना जुने कर्ज फेडावे लागणार आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली पण अद्याप त्यांची अंमलबजावणी झाली नाही. हंगामा सुरू झाला असला तरी पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडला आहे.

जिल्हा बँकेचे 2 लाख 74 हजार 532 थकबाकीदार खाते आहेत. या खातेदारांकडे सुमारे 3 हजार 381 कोटी 10 लाख रुपये थकबाकी आहे. थकीत कर्जदारांना नवीन कर्ज हवे असल्यास त्यांना जुने कर्ज माफ झाल्याशिवाय म्हणजेच बँक खाते नील झाल्याशिवाय नवीन कर्ज मिळणार नाही. थकीत कर्जदार शेतकर्‍यांच्या याद्यांची पडताळणी उपनिबंधक कार्यालयाद्वारे केली जात आहे. यंदा खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनी 5 हजार 547 कोटी रुपयांच्या पतपुरवठ्याचे नियोजन केले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 1 हजार 735 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्हा बँकेकडून अवघे 20 टक्के पीककर्ज वाटप केले आहे. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकर्‍यांना त्यावरील थकीत रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी बँकेत जमा करावी लागेल, त्यानंतरच 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.

कर्जमाफीपासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ यापूर्वी घेतलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफीतील निकषांनुसार फारसा दिलासा मिळालेला नाही. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीककर्ज तसेच पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित पीककर्जाच्या थकीत हप्त्यांचा या योजनेत समावेश सुद्धा आहे. परंतु 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली एक किंवा अधिक बँकांमधील कर्जखात्यांची एकत्रित थकबाकी, मुद्दल व व्याजासह 50 हजार रुपयांपर्यंत असल्यास संबंधित शेतकर्‍यांना या योजनेअंतर्गत कमाल 50 हजारांपर्यंतच कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यावरील शेतकरी वंचित राहतील. मात्र, यंदा थकीत कर्जाच्या डोंगरामुळे मोठ्या संख्येने शेतकरी नवीन कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने कर्जमाफीची प्रक्रिया तत्काळ राबवावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, जुलै महिन्यांच्या दुसर्‍या आठवड्यापासून सरकारची कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होणार आहे. तोपर्यंत शेतकर्‍यांना नवीन कर्जाचा मार्ग बंद राहणार आहे.

थकीत कर्जामुळे बँकांचा ताळेबंद अडचणीत
जून संपत आला. पाऊस नसल्याने शेतकर्‍यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून केवळ घोषणा झालेल्या कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे शेतकर्‍यांची मोठी अडचण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना आता पावसासह कर्जमाफीची प्रतिक्षा आहे. कर्जमाफीच्या आशेमुळे अनेक शेतकर्‍यांनी परिस्थिती असतांना थकीत भरलेले नाही. यामुळे बँकेचे ताळेबंद अडचणीत सापडले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...