Sunday, May 3, 2026
Homeक्राईमSangamner : प्रसाद देण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकर्‍यांची फसवणूक

Sangamner : प्रसाद देण्याच्या बहाण्याने वृद्ध शेतकर्‍यांची फसवणूक

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी (जावळेवस्ती) ढगाडीबाबा जवळ दोन अनोळखी व्यक्तींनी प्रसाद देण्याच्या बहाण्याने एका 68 वर्षीय ज्येष्ठ शेतकर्‍याची तब्बल 60 हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्यांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी दुपारी घडली आहे.

- Advertisement -

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनकर दिघे हे जोर्वे येथील रहिवासी आहेत. ते मागील 20 वर्षांपासून जवळेबाळेश्वर येथे नियमित देवदर्शनासाठी जात असतात. मंगळवारी सकाळी 10 वाजता ते नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. त्यांच्या सोबत रोहिदास फटांगरे (रा. वरूडी पठार) हे मित्र होते. देवदर्शनानंतर परत येताना दिघे यांनी मित्राला बाळेश्वर फाट्याजवळ सोडले आणि स्वतः चंदनापुरी घाट मार्गे जोर्वे गावाकडे निघाले. दुपारी 2 वाजता चंदनापुरी घाट उतरून जात असताना ढगाडीबाबा मंदिराजवळ दोन अनोळखी इसमांनी दिघे यांना हात दाखवून थांबवले. ‘आमच्याकडे प्रसाद आहे, तो दत्ताला वाहायचा आहे. तुम्ही कृपा करून तो वाहा’ असे सांगत त्यांनी बिस्कीटाचे पुडे आणि प्रसादाची पुडी दिघे यांच्या हातात दिली.

भावनेने भारावलेल्या दिघे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सांगण्यानुसार स्वतःच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, एक हिरव्या काचेच्या खड्याची आणि दुसरी पांढर्‍या खड्याची, प्रत्येकी 9 ग्रॅम वजनाच्या, त्यांनी त्या अनोळखी व्यक्तींच्या हवाली केल्या. त्या व्यक्तींनी अंगठ्या एका पुडीत बांधून ती पुडी, प्रसाद व बिस्किटांच्या पुड्यांसह दुचाकीच्या डिकीत ठेवली. मात्र काही वेळातच दिघे यांना संशय आल्याने त्यांनी डिकीतील पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये अंगठ्यांच्या ऐवजी केवळ छोटे दगड आढळून आले. या प्रकारामुळे त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या दोन्ही अंगठ्यांची एकूण किंमत सुमारे 60 हजार रुपये असून, ही फसवणूक धार्मिक श्रद्धेचा वापर करून अतिशय चलाखीने करण्यात आली. या प्रकरणी दिनकर दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...