अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना अहिल्यानगर शहरात कार्यालयासाठी महापालिकेच्या जुन्या कार्यालयातील आयुक्तांचे दालन व कार्यालयाची जागा तत्काळ विना भाडे तत्त्वावर उपलब्ध करून द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. जुन्या आयुक्त दालन व कार्यालयात सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कार्यालय आहे. हे कार्यालय व दालन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी थेट आदेश जारी केल्याने महापालिकेची तारांबळ उडाली आहे.
सभापती शिंदे यांचे चौंडी (ता. जामखेड) हे मूळ गाव असून ते वास्तव्यासाठी याठिकाणी असतात. महाराष्ट्र विधानपरिषदेचे कामकाज हे संवेदनशील व कालमर्यादा विहीत स्वरूपाचे असल्याने सभापतींच्या कार्यालयास त्यांच्याशी सातत्याने संपर्क व समन्वय राखावा लागतो. सभापती शिंदे हे अहिल्यानगर या जिल्ह्यात वास्तव्यास असताना विधान भवन येथील त्यांच्या कार्यालयास सभापती शिंदे यांच्याशी तत्काळ संपर्क व समन्वय साधता यावा, यासाठी अहिल्यानगर या जिल्ह्याच्या ठिकाणी एक कार्यालय कार्यान्वित असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाची तातडी व कालमर्यादा विचारात घेता सभापती शिंदे यांच्यासाठी अहिल्यानगर येथील कार्यालय विनाभाडे तत्वावर तत्काळ उपलब्ध करून द्यावे, असे पत्र विधान मंडळ सचिवालयाच्या सह सचिवांनी 22 जानेवारी रोजी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
त्यावर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सभापती शिंदे यांच्या कार्यालयासाठी अहिल्यानगर येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील आयुक्त दालन व कार्यालयाची जागा तात्काळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही शीघ्रतेने करावी, असे आदेश आयुक्तांना दिले आहेत. मुळातच या जागेत सध्या वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांचे कार्यालय आहे. दालनाशेजारील आयुक्त कार्यालयही आरोग्य विभागच वापरते. जिल्हाधिकार्यांनी या दालन व कार्यालयासाठीच थेट आदेश दिल्याने महापालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे. आरोग्य विभागासाठी नव्याने जागा शोधण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.